चंद्रपूर : जादुटोणा भानामती’ मारहाण प्रकरणी तेरा आरोपी अटकेत | पुढारी

चंद्रपूर : जादुटोणा भानामती’ मारहाण प्रकरणी तेरा आरोपी अटकेत

चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात ‘जादुटोना भानामती’ मारहाण प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत 13 आरोपींना अटक केली आहे. तर घटनेत सात जण जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना किरकोळ जखमींना जिवती येथेच उपचार करून सुटी देण्यात आली आहे. तर पाच जणांवर चंद्रपुरात उपचार सुरु आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पहाडी भागातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द गावात शनिवारी माणुसकीला कलंकित करणारी घटना समोर आली.
गावातील काही कुटुंब जादूटोणा करतात असा संशय नागरिकांना होता, मोहरमच्या सवारी दरम्यान काही महिलांच्या अंगात भानामती आली असल्याचा प्रकार घडला. त्यांनी गावातील हुके व कांबळे कुटुंब हे जादूटोणा करतात असा समज करून अन्य दलित कुटुंबातील व अन्य लोकांच्या मदतीने कसलाही विचार न करता त्या कुटुंबियातील सदस्यांना दोरखंडाने भर चौकात बांधून मारहाण केली.

ह्या प्रकरणाची माहिती मिळताच जिवती पोलीसांनी जखमी झालेल्या नागरिकांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीत 7 जण जखमी झाले असून जखमींमध्ये शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) यांचा समावेश आहे.

पोलिस वेळीच गावात पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला असून पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांनी आरोपीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये सुग्रीव रामाराव शिंदे,दत्ता कांबळे,प्रकाश कोटंबे,बालाजी कांबळे,दादाराव कोटंबे,अमोल शिंदे,गोविंद संभाजी येरेकर,केशव श्रावण कांबळे,माधव तेलंगे,दत्ता शिवाजी भालेराव,सुरज कांबळे, सिध्देश्वर शिंदे, संतोष पांचाळ यांचा समावेश आहे.

पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती सहा पोलिस निरिक्षक संतोष अंबिके करित आहे.

नागारिकांनी कुठल्याही अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नये

गावात सध्या शांततेच वातावरण आहे.तपासअंती निष्पन्न झालेल्या 13 जणांना ताब्यात घेतले आहे.उर्वरीत आरोपींसाठी तपास सुरू आहे. गावातील नागारिकांनी कुठल्याही अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नये असे काही आढळून आल्यास पोलिसांना तातडीने कळवावे.

– सुशिलकुमार नायक, उपविभागिय पोलिस अधिकारी, गडचांदूर

हे ही वाचलत का :

Back to top button