चंद्रपूर : इरईच धरणाचे २ दरवाजे उघडले; ब्रम्हपुरीत शेतकरी वाहून गेला | पुढारी

चंद्रपूर : इरईच धरणाचे २ दरवाजे उघडले; ब्रम्हपुरीत शेतकरी वाहून गेला

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. तसेच धरणेही पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चंद्रपूर शहर, महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. आज, सोमवारी (11 जुलै) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास 1 व 7 क्रमांकाचे दोन दरवाजे 0.25 मिटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. तर इरई नदीकाठावरील गावांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्‍यान, ब्रम्हपूरी तालुक्यातील बेटाळा येथील शेतकरी नाल्यातील प्रवाहातून वाहून गेला.

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिह्यातील नद्या भरभरून दुथडीवाहू लागल्या आहेत. पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातून वाहणारी वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. रविवारी बेटाळहा येथील शेतकरी शेतात जात असताना पाय घसरून पडल्‍याने नाल्यातून वाहून गेला.

महाऔष्णिीक विज केंद्राला लागून असलेल्या इरई धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाल्याने इरई नदीकाठावरील पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव (पोडे), भटाळी, वढोळी, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा (बुजुर्ग), आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर शहर, माना आणि इरई नदीच्या काठावरील गावांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे.

नागरिकांना सतर्क करून पूरस्थितीपासून दूर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास इरई धरणाच्या क्षेत्रातील संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रस्ते बंद करण्यात आले आहेत ,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button