नागपूर : हिंगण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी दोन पोलिस निलंबित | पुढारी

नागपूर : हिंगण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी दोन पोलिस निलंबित

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील हिंगणा पोलिस ठाण्यातंर्गत झालेल्या एका रेव्ह पार्टी प्रकरणी बुधवारी (६ जुलैला)  दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. तसेच ठाणेदाराची तडकापडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. यामुळे पोलिस विभागात खळबळ माजली आहे.

खरसमारी हे गाव हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. या गावाजवळील प्रशस्त गिरनार फार्महाऊस जवळ रेव्ह पार्टी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी मध्यरात्री या ठिकाणी छापा टाकला. विशेष म्हणजे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी स्वत: टाकलेल्या या धाडीची माहिती हिंगणा पोलिसांनाही नव्हती.

या रेव्ह पार्टीत कर्णकर्कश संगीताच्या तालावर नशेतील तरुण-तरुणी नृत्य करताना आढळले. कोट्यवधीचा खर्च करण्यात आलेल्या पार्टीवर कारवाई केली. हा सारा प्रकार राजरोसपणे कसा सुरू होता. याची चर्चा बुधवारी संपूर्ण शहरात रंगली होती. या पार्टीसाठी १० दिवसांपासून समाजमाध्यमांवर जाहिरात केली जात होती. तसेच पार्टीसाठी ग्रामपंचायत, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र ती उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती.

या पार्टीत पुणे, मुंबईसारख्या शहरातून शेकडो तर इतर भागातून अंदाजे तीन हजार तरुण-तरुणी गिरनार फार्महाऊसमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासाठी महागडी विदेशी दारू आणि अन्य अंमली पदार्थाची व्यवस्था केली होती, अशीही माहिती समोर आली आहे.पोलिसांनी या पार्टीतून मोठ्या प्रमाणात दारू, डीजे साहित्य, एलएडी असा १० लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी कारवाई करून ही रेव्हपार्टी उधळून लावली असली, तरी या पार्टीतील गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी आधीपासून काही पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याची बाब उघड झाली आहे. आयोजकांनी कारवाई टाळण्यासाठी हिंगणा पोलिसांशी हातमिळवणी केली होती. त्यामुळेच येथील सुरक्षेची जबाबदारी काही पोलीस कर्मचाऱ्यांकडे होती. या प्रकरणी आणखी कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button