वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात विक्रमी १२३.१६ मीमी पाऊस | पुढारी

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात विक्रमी १२३.१६ मीमी पाऊस

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यात सोमवारी ४ जुलै रोजी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. मागील २४ तासांत आर्वी, देवळी, सेलू तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. आर्वी तालुक्यात विक्रमी १२३.१६ मीमी पावसाची नोंद झाली असून पावसामुळे अंदाजे एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक आहे. तसेच ३५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले असून ८ गोठ्यांची पडझड झाली.

बर्‍याच दिवसांपासून पाऊस नसल्याने काळजी वाढली होती. मागील तीन – चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी रात्रभर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास विविध भागात जोरदार पाऊस झाला. आर्वी मंडळात विक्रमी १७४.४ मीमी पाऊस झाला. वाठोडा मंडळात १११ मीमी, वाढोणा मंडळात १०३ मीमी, विरुळ १२८.२० मीमी, रोहणा मंडळात १५४ मीमी आणि खरांगणा (मोरांगणा) मंडळात ६८.४० मीमी पावसाची नोंद झाली.

आर्वीत तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान वाठोडा मंडळात झाले आहे. सहा मंडळात ५४ गावात २६५ कुटुंबे बाधित झाली. तालुक्यात ३५ कच्ची घरे आणि ८ गोठ्यांची पडझड झाली. देऊरवाडा येथे जवळपास ११० कुटुंबांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. कपडे, अन्नधान्य, भांडी, संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आर्वी तालुक्यातील नदी, नाल्यांच्या काठावर असलेल्या पेरणी केलेल्या अंदाजे १ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्त भागात शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मागील २४ तासात आठ तालुक्यात ४४५.९६ मीमी सरासरी ५५.७५ मीमी पावसाची नोंद झाली.

आर्वी, देवळी, सेलू तालुक्यात अतिवृष्टी नोंदविल्या गेली. आर्वी तालुक्यात सर्वाधिक १२३.१६ मीमी तसेच सेलू तालुक्यात ७०.६० तर देवळी तालुक्यात ८६.८५ अशी अतिवृष्टी झाली. सर्वदूर आलेल्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सरासरी ५५.७५ मीमी पावसाची नोंद झाली.

संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश : विद्यासागर चव्हाण

आर्वी तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाली. शेतपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत, असे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी सांगितले.

Back to top button