अकोला : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस सात वर्षाची शिक्षा | पुढारी

अकोला : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस सात वर्षाची शिक्षा

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील दोषी आरोपीस न्यायालायाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही.डी.पिंपळकर यांनी सोमवारी दिला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अरुण खंडारे (रा. लाखपुरी) याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी 19 फेब्रुवारी 2016 रोजी तक्रार दिली होती. त्यानूसार मुर्तिजापूर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधीत मुलीस आरोपीने खाऊच्या बहाण्याने घरातून उचलून नेले होते. याप्रकरणात सरकारतर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले.

आरोपी सर्व शिक्षा एकत्रच भोगणार

साक्षीदारांच्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस 7 वर्ष सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद व पोक्सो कायदा नुसार 5 वर्ष सक्त मजुरी 4- 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपीस एकत्रच भोगावयाच्या आहेत.

याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रतापसिंह सोळंके यांनी केला. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. हेड कॉन्स्टेबल संजय भरसाकळे व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी म्हणून सहाय्य केले. या प्रकरणात एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रभुदास ढोरे हा फितूर झाला. त्यामुळे त्याच्यावर भा.द.वि कलम 191 नुसार खोटी साक्ष दिल्यामुळे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा

Back to top button