चुलत भावानेच केला घात ; नागपूरच्या व्यापाऱ्याचा भंडाऱ्यात खून | पुढारी

चुलत भावानेच केला घात ; नागपूरच्या व्यापाऱ्याचा भंडाऱ्यात खून

भंडारा पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरातील व्यापाऱ्याचा भंडारा जिल्ह्यातील इटगाव जंगल परिसरात खून करुन पसार झालेल्या आरोपीला भंडारा स्थानिक गुन्हे शाखा आणि अड्याळ पोलिसांच्या पथकाने १२ तासात अटक केली. नात्याने चुलत भाऊ असलेल्या आरोपीनेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अनिकेश अजाबराव क्षीरसागर (४९ रा. चिखली लेआऊट नागपूर ) असे मृत व्यक्तीचे नाव असून संदेश राजेंद्र क्षीरसागर (२४ रा. पिपला, हुडकेश्वर नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील इटगाव जंगलात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिस पाटील पुरुषोत्तम चौधरी यांनी पोलिस स्टेशन अड्याळ येथे दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू, अड्याळ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीदरम्यान तो मृतदेह अनिकेश अजाबराव क्षिरसागर या व्यापार्‍याचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अड्याळ येथील व्यापाऱ्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका दुकानात अनिकेश व त्याचा भाऊ संदेश हे नागपूरहून कलेक्शनसाठी आले व भंडाराच्या दिशेने नागपूरकरीता निघाल्याचे दिसले. त्यानंतर संदेशशी फोनद्वारे संपर्क साधला असता तो एकटाच कलेक्शनकरीता ब्रम्हपुरी येथे आला. भाऊ अनिकेश क्षीरसागर कार घेवून भंडाराकडे गेल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यात फरक जाणवत असल्याने पोलिसांनी त्याला अड्याळ पोलिस ठाण्यात येण्यास बजावले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु तांत्रिक पुरावे व त्याच्याजवळ मिळालेले साहित्य ज्यावर रक्ताचे डाग होते, यावरुन त्याची कसून चौकशी केली असता त्याने धारदार शस्त्राने अनिकेश यांची निर्घृन हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी संदेशने गाडीतील रोकड, अनिकेशच्या शरीरावरील सोन्याचे आभूषण, शस्त्र, चटई व टिफीन इत्यादी साहित्य आपल्या बॅगमध्ये टाकुन ब्रम्हपुरीच्या दिशेने निघून गेला होता.

संदेशला होती वाईट संगत

आरोपी संदेश राजेंद्र क्षीरसागर हा पूर्वीपासूनच वाईट संगतीत होता. तो सुधारावा म्हणून अनिकेशने त्याला आपल्या व्यापारात सोबत घेतले. परंतु संदेशने व्यापारातही अपहार करुन अनिकेशला लाखांचा गंडा घातला. तरीदेखील वडील बंधू या नात्याने संदेशला वेळोवेळी सुधारण्याची संधी दिली. परंतु त्याने अनिकेशचा काटा काढण्यासाठी कट रचला. कलेक्शनकरीता दोघे भाऊ नागपूरहून जेवणाचा डब्बा घेऊन निघाले. अनिकेशला जंगलात जेवणाचा छंद असल्याने अड्याळ येथील कामकाज आटोपून इटगावच्या जंगलात रस्त्यालगत कार लावून जेवणास बसले. तेवढ्यात संदेशने त्याच्या बॅगमधील शस्त्र काढून पाठमोऱ्या बसलेल्या अनिकेशच्या मानेवर सपासप वार केले. या हल्‍ल्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

हेही वाचा

Back to top button