नागभीड येथे प्रियकराने केली प्रेयसीची हत्या | पुढारी

नागभीड येथे प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

चंद्रपूर,पुढारी वृत्तसेवा : नागभीड येथील चवडेश्वरी माता मंदिर परिसरात ‍प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली.

सकाळी 10 वाजता ही घटना घडली. पूजा रवींद्र सलामे (२८) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे.

नागभीड येथील चवडेश्वरी माता मंदिर परिसरात मृत पूजा रवींद्र सलामे ही आपल्या आई सोबत राहत होती.

तिचे लग्न चिखल परसोडी येथील बागडे नावाच्या युवकाशी झाला होता. मात्र त्याच्याशी मतभेद झाल्याने ही युवती आपल्या आईकडे नागभीडला राहत होती.

तिचे परसोडी येथीलच विवेक ब्रम्हदास चौधरी (२५) या युवकाशी प्रेमसंबंध जुळले. एक महिन्यापूर्वी काही कारणास्तव दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती आहे.

शनिवारी सकाळी प्रियकर विवेक (२५) हा सकाळी पूजाला भेटायला तिच्या नागभीड येथील घरी आला होता.

यावेळी पूजा घराबाहेर बाहेर गेली होती.

सपासप वार करून प्रेयसीची हत्या

मात्र काही वेळात ती घरी परतल्यानंतर आरोपीने पूजाच्या गळ्यावर धारधार शस्त्राने सपासप वार केले. यात पूजाचा जागीच मृत्यू झाला .

त्यानंतर आरोपींने शरणागती पत्करून पोलिस स्टेशन मध्ये जाऊन प्रेयसीची हत्या केल्याची  माहिती दिली.

पोलिस लागलीच घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून प्रेत ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले.  दिवसाढवळ्या प्रेयसीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Back to top button