पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक अनोखं आणि मजेशीर दृश्य पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक आक्रमक झालेलं अस्वल चक्क वाघाचा पाठलाग करत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
अस्वल आणि वाघाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचा शेवट मात्र अनपेक्षित आहे. प्रथम वाघ अस्वलासमोर उभा राहून त्याचा मार्ग अडवताना दिसतो. तर अस्वल अचानक वाघावर हल्ला करते आणि अस्वलाचा आक्रमक पवित्रा पाहून वाघही अस्वलाला भिऊन पळू लागतो. मात्र, अस्वलाने या वाघाचा पाठलाग सुरूच ठेवला असल्याचे नाट्यमय दृश्य या व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे नेटकरीदेखील याची चांगलीच मजा घेत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात शूट झालेल्या व्हिडिओमधील वाघ हा 'टी-१९' याप्रकारातील असल्याचे सांगण्यात येते.
अस्वल आणि वाघाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध असून, परदेशातून पर्यटक येथे वाघ पाहण्यासाठी येतात. जंगलसफारी दरम्यान पर्यटकांना असे अनोखे आणि सुखद अनुभव अनेकदा येत असतात.