नागपूर क्राईम : कुख्यात गुंडाचेच अपहरण करून हत्या; दोघांना अटक | पुढारी

नागपूर क्राईम : कुख्यात गुंडाचेच अपहरण करून हत्या; दोघांना अटक

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या (नागपूर क्राईम) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

विशेष म्हणजे ज्या गुंडाचा खून करण्यात आला आहे तो गुंड पोलीसांच्या भितीने लपून छपून वावरत होता. नागपुरातील मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड छोटा इब्राहिम याचे यशोधरानगरातून तिघांनी अपहरण केले आणि त्याच्या पोटात धारदार शस्त्र भोसकून खून केला.

मृतदेह पोत्यात टाकून कन्हान नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम खान ऊर्फ छोटा इब्राहिम (२२, रा. बोरियापुरा, मोमिनपुरा) हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर अर्धाडझन गुन्हे दाखल आहेत.

त्यामध्ये एका युवकाच्या हत्येचाही समावेश होता. पोलिसांनी छोटा इब्राहिमवर तडीपार आणि एमपीडीएची कारवाईसुद्धा केली होती. दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी त्याला दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाही त्याला पकडले होते.

पण, तो पळून गेला होता. पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी तो यशोधरानगरातील मित्राच्या घरी लपून बसला होता. तो चोरून-लपून मोमीनपुऱ्यात येत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी इब्राहिमबाबत बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली नव्हती.

छोटी इब्राहिमचे आरोपी राशिद खान (रा. कामठी), शम्मी, सोनू ऊर्फ इमरान आणि अरबाज यांनी यशोधरानगरातून अपहरण केले. त्याला निजामुद्दीन कॉलनीतील एका विटाभट्टीजवळ नेले. त्याच्यावर तलवार-चाकूने हत्या केली.

छोटा इब्राहिम याचे तीन दिवसांपूर्वीच चौघांनी अपहरण केल्याची माहिती त्यांच्याच एका मित्राने पोलिसांना दिली. त्यावरून सोनू आणि शम्मूला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी इब्राहिमचा खून करून कन्हान नदीच्या वाहत्या पाण्यात मृतदेह फेकल्याची माहिती दिली.

त्यावरून पोलिसांनी इब्राहिमच्या कुटुंबियांना कन्हानला नेले. पाण्यात दोन मृतदेह आढळले होते. त्यापैकी एक मृतदेह इब्राहिमचा असल्याचे स्पष्ट झाले. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली तर दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे नागपूर क्राईम विश्वात खळबळ आश्चर्य व्यक्त केले जाते.

पहा व्हिडीओ : आईचे तुकडे करणारा कसा पोहोचला फाशीच्या शिक्षेपर्यंत ?

Back to top button