चंद्रपूर : अखेर अतिक्रमणधारकांच्या 'स्वप्नां'वर चालला रेल्वे प्रशासनाचा बुलडोजर ! | पुढारी

चंद्रपूर : अखेर अतिक्रमणधारकांच्या 'स्वप्नां'वर चालला रेल्वे प्रशासनाचा बुलडोजर !

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मागील ४० वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून शेकडों गोरगरीब कुटूंबांनी संस्कार थाटले हाेते. आता रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणधारकांच्या घरांवर बुलडोजर चालवले. भद्रावती तालुक्यातील माजरी येथील वेकोली वसाहृतील १७ अतिक्रमणधारकांची घरे जमिनीदोस्त करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कार्यवाही मंगळवारी ( दि. १७ मे) केली आहे.

विशेष म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अतिक्रमणधारकांबाबत बैठक घेऊन पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण काढू नये, असे निर्देश दिले होते. परंतु, रेल्वे प्रशासनाला या निर्देशांचे विसर पडल्याचे या घटनेवरून दिसून आले.

भद्रावती तालुक्यातील माजरी परिसरातील वेकोली वसाहतीत रेल्वेच्या जागेवर मागील ४० वर्षांपासून शेकडो कुटूंबांनी अतिक्रमण करून संसार थाटला हाेता. रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणधारकांना १३ मेपर्यंत घरे खाली करण्याची नोटीस बजावली. अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अतिक्रमण धारकांच्या घरांवर बुलडोजर चाविण्याच्या पहिल्या टप्प्यात १७ अतिक्रमण धारकांचा समावेश होता. सदर नोटीस अतिक्रमणधारकांच्या हातात पडताच नोटीसीला विरोध दर्शवत स्थानिक लोकप्रतिनिधी व अतिक्रमणधारकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला.

माजरीतील व्यापारी संघटना, माजरी संघर्ष समिती व पीडित नागरिकांनी शनिवारी (१४ मे) रोजी रेल्वे प्रशासनाविरोधात जन आक्रोश मोर्चा काढत अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचा कडाडून विरोध केला. रेल्वे प्रशासनाने घरे पडण्याचा निर्णय मागे घ्यावा शेकडो महिला -पुरूषांनी रेल्वे रूळावर येऊन निषेघ नोंदविला होता. यानंतर तीन दिवसानंतर मंगळवारी रोजी रेल्वे प्रशासनाने सकाळी ६ वाजता नागरिकांच्या विरोधाला न जुमानता दोन बुलडोझरच्या सहाय्याने पहिल्या टप्यातील १७ घरांवर बुलडोजर चालविला. अतिक्रमण हटविण्याची कारवाई दुपारी ३ वाजेपर्यंत राबविण्यात आली. यावेळी रेल्वे पोलीस फोर्स, दंगा नियंत्रण पथक, स्थानिक पोलीस दल, वरोरा, भद्रावती येथील पोलिस कुमक बोलावून माेठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

अतिक्रमणधारकांच्या घरांवर बुलडोजर चालविल्या जात असल्याची माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य प्रवीण सूर, राजेश रेवते, उल्हास रत्नपारखी यांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कलम ६८ नुसार रेल्वे प्रशासनाची कारवाई पूर्ण होईपर्यंत स्थानबद्ध करून ठेवले. यावेळी वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात जवळपास ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळावर येण्यास नापसंती दर्शविली. विशेष म्हणजे, यावेळी परिसरात कलम ३७ (१) लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना घटनास्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला.

शेकडो अतिक्रमणधारक धास्तावले

अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्हयातील बल्लारशाह, चंद्रपूर व माजरी परिसरात रेल्वेच्या जागांवर अतिक्रमण करून नागरिकांनी आपला संसार थाटला आहे. आज ना उद्या रेल्वे प्रशासन आपल्याला निवासी जागा उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा अतिक्रमणधारक कुटूंबियांना होती; परंतु रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्यातील १७ घरांवर थेट बुलडोजर चालविल्याने अतिक्रमणधारक प्रचंड धास्तावले आहेत.

काही दिवसांपूर्वीच आमदार सुधीर मुनगंटीवार हे अतिक्रणधारकांच्या पाठीशी ठाम उभे होते. त्यांनी जिल्हाधिकारी व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेऊन पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला होता. परंतु, कोणतीही पर्यायी व्यवस्था न होता रेल्वे प्रशासनाने बुलडोजर चालविल्याने आता संसार कुठे थाटायचा? असा प्रश्न शेकडो कुटूंबियांसमोर पडला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button