चंद्रपूर : मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : मासे पकडण्याकरिता गेलेल्या दोन जणांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना भद्रावती तालुक्यातील माजरी येथे शनिवारी घडली. अशोक रामपाल यादव ( वय ४२) व रोहीत राहुल मलय्या (वय ८) अशी मृतांची नावे असून ते माजरी येथील एकतानगर वस्तीतील रहिवासी होते.

याबाबत अधिक माहिती अशी, अशोक आणि रोहीत हे दोघेजण इतर तीन जणांसोबत मासे पकडण्याकरिता गावाजवळच्या वर्धा नदीवर गेले. तेथे मासे पकडत असताना अशोक व रोहित दोघेही नदीच्या पात्रात उतरले. त्या ठिकाणी असलेल्या डोहात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडून मरण पावले.

या घटनेची माहिती माजरी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी नावाड्यांच्या मदतीने दोघांचा मृतदेह शोधून काढला. त्यानंतर मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. सदर प्रकरणी माजरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे माजरी येथे शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button