‘सूर्यप्रभा’ : पहिला ‘सौरकूकर’ तयार करणारे प्रभाकरराव मराठे ठरले उपेक्षेचे धनी | पुढारी

‘सूर्यप्रभा’ : पहिला ‘सौरकूकर’ तयार करणारे प्रभाकरराव मराठे ठरले उपेक्षेचे धनी

वर्धा ; पुढारी वृत्तसेवा : अलीकडच्या काळात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीची चर्चा करतानाच ऊर्जा टंचाईच्या काळात सौरऊर्जेची महती सारेच सांगू लागले आहेत.पण सुमारे पावणेपाच दशकांपूर्वी सर्वोदयी विचारक प्रभाकरराव मराठे यांनी 1973च्या आसपास तयार केलेला पहिला सौरकूकर आज विस्मरणात गेला आहे. पहिला सौरकूकर तयार करणारे प्रभाकरराव मराठे हे या महत्त्वपूर्ण संशोधनाबाबत उपेक्षेचेच धनी ठरले!

हा राज्यातील पहिलाच सौरकूकर असावा आणि या प्रकारचे हे राज्यातील पहिलेच संशोधन मानले जाते. पण तो पहिला सौरकूकर सध्या कोठे आहे,याची माहिती कुठेही नाही. या पहिल्या सौरकूकरला त्यांनी ‘सूर्यप्रभा’असे नाव दिले होते. त्यातील प्रभा हा शब्द प्रभाकररावांच्या नावाशी जुळणारा होता. प्रभाकररावांनी केलेले हे सौरकूकरचे संशोधन सर्वोदय मंडळाला अर्पण केले होते. पवनारच्या विनोबाजींच्या आश्रमात येत त्यांनी या सौरकूकरचे प्रात्यक्षिकही दिले होते.

निर्मलाताई देशपांडे यांच्या भगिनी कुसूमताई देशपांडे या प्रसंगाच्या साक्षीदार होत्या. बरेच दिवस हा सौरऊर्जेवर चालणारा कूकर त्यांनी पवनार आश्रमात ठेवला होता.आज कुसूमताई देशपांडेही नाहीत आणि सौरऊर्जेवर प्रभाकरराव मराठे यांनी तयार केलेला राज्यातील पहिला सौरकूकर कोठे आहे, हेदेखील माहीत नाही.

सर्वोदयाला समर्पित जीवन जगलेले स्व. प्रभाकरराव मराठे हे कर्नाटकातील अनगोळचे रहिवासी होते. पण महाराष्ट्रात पवनार,सेवाग्रामला त्यांचे येणे-जाणे राहायचे. प्रभाकरराव मराठे यांच्या पत्नी भारतीताई मराठे यांनी पहिल्या सौरकूकरच्या आठवणी संग्रहीत ठेवल्या होत्या. आता त्यांचाही संपर्क नाही.

बहिर्गोल भिंगातून सूर्यकिरणे गेली की उष्णता निर्माण होत कापूसही जळतो,मग याच उष्णतेचा वापर करून अन्न का शिजविले जाऊ नये,हे मराठे यांच्या सौरकूकरच्या संशोधनाचे सूत्र होते.सौरऊर्जेचा वापर अन्न शिजविण्याकरीता केला तर झाडांची तोड कमी होईल,असा विचार त्यांनी मांडला. या प्रयोगाच्या वाटचालीत प्रभाकरराव मराठे यांनी पहिल्यांदा प्लास्टिकच्या कागदावरून सूर्यकिरणे परावर्तीत होतील काय,याचा अंदाज घेतला. पण, यात त्यांना यश आले नव्हते.नंतर त्यांनी घराच्या बाहेरील कट्ट्यावर एका पेटीत गवत ठेवून त्यावर एका बंद भांड्यात पाणी आणि तांदूळ ठेवले. या भांड्यावर सूर्यकिरणे परावर्तीत करून सोडण्यास त्यांच्याकडे मोठे बहिर्गोल भिंग नव्हते.

मग प्रभाकरराव मराठे यांनी घरातील तसबिरीची काच काढून त्याची विशिष्ठ पद्धतीने मांडणी केली व त्यातून सूर्यकिरणे सोडली.काळा रंग सूर्यकिरणे अधिक शोषून घेतो,याची माहिती असल्याने त्यांनी अ‍ॅल्युमिनिअम डब्याच्या झाकणाला बाहेरून काळा रंग लावला.त्यात तांदूळ शिजवायला ठेवले.यात त्यांना यश आले.सुमारे तीन तासांनंतर तांदळाचा भात तयार झाला. मराठे यांनी स्वत: भाताची चव चाखली.

शिवाय पत्नी भारतीताईंनाही हा भात खायला दिला.पुढे त्यांनी घरच्या आरशातून सूर्यकिरणे परावर्तीत करून या भांड्यावर सोडली.यात भात लवकर तयार झाला आणि प्रभाकररावांनी तयार केलेला राज्यातील पहिला सूर्यप्रभा नावाचा हा सौरकूकर प्राथमिक अवस्थेत तयार झाला.नंतर त्यांनी चौकोनी डबा तयार करून त्याच्या झाकणाला आरसा बसवत त्यावरून अन्न शिजविण्यास ठेवलेल्या डब्यावर सूर्यकिरणे सोडली.येथे सूर्यकिरणे परावर्तीत करण्याचे नियोजन असलेला राज्यातील पहिला सौरकूकर पूर्णत्वाने तयार झाला.

हा सौरकूकर घेऊन प्रभाकरराव मराठे पवनार या त्यांच्या श्रद्धास्थानी असलेल्या आश्रमात आले होते. सर्वोदय मंडळाला त्यांनी ही संशोधन संपत्ती अर्पण केली. आता हा पहिला सौरकूकर कोठे ठेवला याची काहीच माहिती मिळत नाही.आता सौरकूकरचे स्वरूप बदलले.नव्या आकारात सौरकूकर तयार झाले,पण या संशोधनाचे पहिले धनी प्रभाकरराव मराठे यांचे नाव कोणाच्याही नोंदीत नाही.

Back to top button