चंद्रपूर : भरधाव ट्रकने ५ मजुरांना चिरडले; २ ठार तर ३ जखमी | पुढारी

चंद्रपूर : भरधाव ट्रकने ५ मजुरांना चिरडले; २ ठार तर ३ जखमी

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : घुग्घुस-वणी मार्गावर घुग्घूस पासून 5 कि.मी अंतरावरील पुनवट गावाजवळ काम करणाऱ्या 5 मजुरांना ट्रकने चिरडले. सर्व मजुर आयव्हिआरसीएल कंपनीमध्ये काम करत होते. यामध्ये 2 मजूर घटनास्थळी ठार झाले तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी चारच्या सुमारास घडली.

महादेव बालवटकर ( रा.बेलोरा ), राजू मिलमिले (रा. मारेगाव ) असे मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये सुरेश जूनघरी, सतीश गेडाम आणि अन्य एक मजुराचा समावेश आहे. जखमींना वणी येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चंद्रपूर ते वणी राज्यमार्ग 7 ह्या रस्त्याचे सिमेंट बांधकाम यापूर्वी झाले आहे. परंतु बांधकाम योग्य न झाल्याने रस्त्यांना भेगा व खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर रस्त्याची डागडूजीचे काम आयव्हीआरसीएल ह्या कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

आयव्हीआरसीएल कंपनीच्या मजूरांकडून रस्त्याची दुरूस्ती करण्याचे काम सुरू होते. याकरिता दुरूस्तीचे साहित्य आणण्यात येत होते. दुपारी चारच्या सुमारास घुग्घूस पासून 5 कि.मी. अंतरावरील पुनवट गावाजवळ वणी कडून भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. एम एच 31 एफ सी 6399) काम करीत असलेल्या पाच मजुरांना चिरडून टाकले. ट्रक एवढा भरधाव होता की अपघतानंतर ट्रकने ट्रॅक्टर व पिकअपला  धडक दिली. त्यानंतर ट्रक घेऊन चालक पळून गेला. या मध्ये 2 मजूर बालवटकर, मिलमिले यांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 मजूर गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिरपूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा  

Back to top button