बुलडाणा : लग्नाच्या पूर्वसंध्येला नवऱ्या मुलाच्या ‘अफेअर’ची पोलखोल; लग्नाऐवजी अडकला पोलिसांच्या बेडीत | पुढारी

बुलडाणा : लग्नाच्या पूर्वसंध्येला नवऱ्या मुलाच्या 'अफेअर'ची पोलखोल; लग्नाऐवजी अडकला पोलिसांच्या बेडीत

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : लग्नाआधीचा दिवस हळदीने रंगण्याचा, उत्साहाचा आणि धामधुमीचा उभय पक्षाकडे आनंदाचा माहौल भरलेला. अशातच नियोजित वधूच्या मोबाईलवर नवऱ्या मुलाच्या ‘अफेअर’ची फोटोसह माहिती मिळते. यामुळे वधूसह तिचे कुटुंबीय हादरून जाते.

अखेर नवरी मुलीने नियोजित वराला फोन करून याचा जाब विचारला. त्यानंतर तो आपल्या भावांना सोबत घेऊन हातावर रंगलेली मेहंदी व ओल्या हळदीच्या अंगानेच नवरी मुलीच्या गावी पोहोचला. त्याने वधूच्या घरी राडा करत नवरी मुलीचे केस ओढले, धक्काबुक्की केली. त्याचबरोबर जाता जाता त्याच्या व एका विवाहित महिलेच्या अनैतिक संबंधाची कबुली दिली. आणि हे लग्न मोडल्याचे सांगून गेला. एकूणच या प्रकारामुळे सनईचे सूर क्षणार्धात बेसूर झाले. सारे कसे अकल्पित घडले. तर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अखेर नवऱ्या मुलाची वरात पोलीस कोठडीपर्यंत पोहोचली.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, बोराखेडी (ता. मोताळा) येथील अमोल गणेश पारेकर याचे मलकापूर येथील तरूणीशी लग्न जुळले होते. अमोल हा सुरत (गुजरात) येथे रेल्वेत लोकोपायलट आहे. नोकरदार जावई म्हणून मुलीच्या कुटुंबियांनी थाटामाटात त्यांचा साखरपुडा केला होता. १ मे ही लग्नतिथी ठरल्याने ३० एप्रिलला वर व वधू पक्षाकडे हळदी सोहळा (नानमुख) होता. याचदिवशी गुजरातमधून अचानक आलेल्या एका मोबाईल कॉलमुळे नियोजित वराच्या चारित्र्याबाबत कळले. आणि नवऱ्या मुलीचे वैवाहिक आयुष्य उद्वस्थ होण्यापासून वाचले. दरम्यान, मलकापूर शहर पोलिसांनी अमोल पारेकर व त्याचे कुटुंबातील ११ जणांवर गुन्हा दाखल करून आरोपी अमोल याला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button