भंडारा : धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणास अटक

भंडारा; पुढारी वृत्तसेवा: नागपूर येथे फिरायला जाऊ म्हणत धावत्‍या बसमध्‍ये  विद्यार्थिनीवर बलात्कार करण्‍यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्‍या वडिलांनी तक्रार दिल्‍यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी राजेश ईश्वर मडावी ( वय १९ ) या युवकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,  राजेश ईश्वर मडावी ( रा. बोदरा ता. साकोली )  याने अल्पवयीन विद्यार्थिनीला नागपूर येथे फिरायला जाऊ असे सांगितले. १२ एप्रिल रोजी सायंकाळी गोंदिया-नागपूर बसमध्ये ताे मुलीला घेऊन गेला. बसमध्ये ११ प्रवासी प्रवास करीत होते. बसमध्ये वाहक नसल्याचे पाहून राजेशने धावत्या बसमध्‍ये विद्यार्थिनीवर बलात्कार केला. नागपूरला पोहोचल्यानंतर राजेश विद्यार्थिनीला आपल्या नातेवाईकाकडे घेऊन गेला. त्या नातेवाईकाला राजेश आणि मुलीवर संशय आल्याने त्याने दोघांना ताबडतोब घरातून निघून जाण्यास सांगितले. यानंतर राजेश व अल्पवयीन विद्यार्थिनी मध्यरात्री बोदरा येथे परतले.

बुधवारी (१३ एप्रिल) रोजी विद्यार्थीनीच्या वडिलांनी साकोली पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, बोदरा येथील पोलीस पाटलांनी सदर बेपत्ता असलेली विद्यार्थिनी आणि राजेश बोदरा येथे असल्याची माहिती साकोली पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ बोदरा गावात जाऊन बेपत्ता विद्यार्थिनी व राजेशला ताब्यात घेतले.अल्पवयीन विद्यार्थिनी व राजेशची वैद्यकीय तपासणी केली असता झालेला प्रकार समोर आला. यानंतर राजेशवर कलम ३७६, ३६३, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Exit mobile version