नितीन गडकरी यांची कोणतेही काम तत्काळ करून दाखवणे हीच ओळख - पुढारी

नितीन गडकरी यांची कोणतेही काम तत्काळ करून दाखवणे हीच ओळख

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोणतेही काम टोलवाटोलवी न करता स्वीकारून तत्काळ करून दाखवणे हीच नितीन गडकरी यांची देशभर ओळख आहे. ही ओळख अधिक गतिमान आणि वृद्धींगत होत जावाे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल काढले.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौका दरम्यान बांधण्यात येणाऱ्या आरओबी भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. त्यावेळी ठाकरे यांनी गडकरींचे ताेंडभरून कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराचे भाषणात कौतुक केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेच्या दर्जेदार कामाचे कौतुक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही केले होते याची आठवण सांगितली.

सोबतच राज्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची आठवण करुन देत सध्या कोरोनासोबतच नैसर्गिक आपत्तीशी महाराष्ट्र झुंजत आहे. तौक्ते वादळाचे, पूर अतिवृष्टीचे संकट, खचणारे रस्ते, दरडी यातून राज्य निश्चितच सावरेल.

मात्र यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून अनेक पिढ्यांसाठी टिकेल अशा नवीन तंत्रज्ञानाने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला उर्जा मंत्री नितीन गडकरी, क्रीडा मंत्री सुनील केदार उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आभासी पद्धतीने उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, तुमची एक वेगळी ओळख आहे. ती नेमक्या शब्दात मांडता येणे कठीण आहे. असे कर्तुत्व आपण दिवसागणिक सिद्ध करीत चालले आहात, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.

पण, तुम्ही तत्काळ करतो असे सांगून ते करून दाखवले

महाराष्ट्रात युतीचे सरकार असतानाचे दिवस अजूनही आठवतात. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ईच्छेवरून तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधला. स्वप्न पाहायलाही मुळामध्ये धाडस लागते. आणि ते प्रत्यक्षात आणने हे त्यापेक्षाही मोठे कर्मकठीण काम असते. दुसरा एखादा असता तर त्याने बघतो, करतो असे सांगितले असते.

हे कसे काय शक्य आहे, असे प्रश्न उपस्थित केले असते. पण, तुम्ही तत्काळ करतो असे सांगून ते करून दाखवले. आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरात कर्तुत्वाने निर्माण करीत आहात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विदर्भात ब्रॉडगेज मेट्रोचे जाळे : नितीन गडकरी

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी पूर्व विदर्भात ब्राॅडगेज मेट्रोचे जाळे विणत असल्याचे सांगितले. यामुळे प्रवासाच्या वेळेत खूप बचत होणार आहे. नागपूर ते वडसा हा ब्रॉडगेज मार्ग पूर्णत्वास जाईल.

सोबतच उमरेड पुढील भिवापूर पर्यंतच्या चार पदरी रस्ते मार्गामध्ये वने व पर्यावरण विभागाच्या आक्षेपांची पूर्तता झाल्यास हा रस्ता देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले.

नागपूर ते उमरेड ब्राॅडगेज मेट्रोचे काम सुरू झाले आहे. केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या उर्जा विभागाच्या निधीतून खर्च होत आहे. कोराडी खापरखेडा प्रकल्पासाठी येणाऱ्या कोळशासाठी २२ तास लागायचे. आता दोन ते तीन तास लागणार आहे, असे गडकरी म्हणाले.

नव्या रेल्वे लाईन मुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळशाची सुलभ वाहतूक होणार आहे असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचलं का?

Back to top button