गुगुळ पिंपरी : प्रेम प्रकरणात ८ जणांनी काठीने मारहाण करत तरुणाची केली हत्या | पुढारी

गुगुळ पिंपरी : प्रेम प्रकरणात ८ जणांनी काठीने मारहाण करत तरुणाची केली हत्या

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे गावात आलेला तरुणाचा काठ्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध मंगळवारी 6 गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल परसराम इंगोले (वय-26) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथील अमोल परसराम इंगोले याचे गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसानंतर त्या मुलीने तसेच तिच्या नातेवाईकांनी 2013 ते 2015 या कालावधीत अमोल याच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचे तीन गुन्हे दाखल केले. त्यामुळे अमोल घाबरून गेला होता. दरम्यान सतत गुन्हे दाखल होत असल्यामुळे अमोल बाहेर गावी राहू लागला होता.

मंगळवारी रात्री अमोल गुगुळ पिंपरी येथे घरी आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर गावातील विजय नामदेव इंगोले, कैलास नामदेव इंगोले, विलास नामदेव इंगोले, राजू नामदेव इंगोले, गोलू विलास इंगोले, आकाश विलास इंगोले, नामदेव मुगाजी इंगोले, देवानंद उत्तम उचित यांनी त्याच्या घरी जाऊन तू गावात कसा आलास अशी विचारणा करून त्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

शाब्दिक चकमकीनंतर या आठ जणांनी अमोल यास लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे भांडण सोडविण्यासाठी अमोल याचे वडील परसराम इंगोले भांडणामधे पडले असता त्यांनाही मारहाण झाली. या मारहाणीमध्ये अमोल इंगोले याचा मृत्यू झाला. याप्रकरणी परसराम इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील आठ जणांविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार गजानन बेडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने आज सकाळी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. यामध्ये पोलिसांनी विलास इंगोले आणि गोलू इंगोले यांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

हे वाचलंत का? 

Back to top button