भंडारा : मोहाची फुले वेचण्यासाठी गेलेला व्यक्‍ती वाघाच्या हल्‍ल्‍यात ठार | पुढारी

भंडारा : मोहाची फुले वेचण्यासाठी गेलेला व्यक्‍ती वाघाच्या हल्‍ल्‍यात ठार

भंडारा : पुढारी वृत्‍तसेवा मोहाची फुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे आज (मंगळवार) उघडकीस आली. जयपाल घोगलू कुंभारे (वय ४५) असे मृत्‍यू झालेल्‍या इसमाचे नाव आहे. तो इंदोरा (सोनी) येथील रहिवासी आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, जयपाल कुंभारे हा नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता इंदोरा येथील वन विभागाच्या नर्सरीजवळील जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेला होता. मोहफुल वेचल्यानंतर सायकलने गावाकडे परत येत असताना पुन्हा झाडाखाली मोहफुले पडल्‍याची त्‍याला दिसली. यामुळे तो रस्त्याजवळील झाडाखालची मोहफुले वेचू लागला. यावेळी अचानक वाघाने त्‍याच्यावर हल्ला केला. वाघाने जयपालला घटनास्थळावरून अर्धा किमी अंतरावर फरपटत नेले. तिथे वाघाने त्याचा उजवा पाय संपूर्ण खाल्ला.

जयपालची सायकल रस्त्यावर पडून होती. पण जयपाल दिसत नसल्याने जंगलात शोध सुरू झाला. जेथे जयपाल मोहफुल वेचत होता त्याच ठिकाणी मोबाईल व चप्पल आढळून आली. त्यानंतर जंगल परिसरात शोधले असता, अर्धा किमी अंतरावर जयपालचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी वनविभागाने जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सोबतच मृतकाच्या घरी भेट घेऊन कुटुंबियांची विचारपूस केली. जयपालच्या मागे आई, पत्नी, दोन मुली तसेच एक मुलगा असा परिवार आहे.

Back to top button