नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट कायम, चंद्रपूर जिल्ह्यात ४४.२ तापमानाची नोंद | पुढारी

नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट कायम, चंद्रपूर जिल्ह्यात ४४.२ तापमानाची नोंद

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. अंग भाजून काढणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. बुधवारी चंद्रपूर राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. तेथे कमाल ४४.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. यापूर्वी २० एप्रिल २०१८ मध्ये ४५.९ तर १८ एप्रिल २०१८ मध्ये ४४.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

आणखी किमान तीन ते चार दिवस ही लाट कायम राहणार असून पुढील काही दिवस तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ होत जाईल, असा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. दरवर्षी साधारणत: एप्रिलमध्ये विदर्भात उन्हाळा सुरू होतो. तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसवर जाते. पण, यावर्षी मार्चच्या पंधरवड्यापासूनच तापमानात वाढ नोंदवण्यात आली. उष्णतेच्या लाटेमुळे सकाळी ९ वाजतापासूनच कडक ऊन राहते.

कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये, पाणी भरपूर प्यावे अशा सूचना महापालिकेने केल्या आहे. गमछा, टोपी, गॉगल, हातमोजे घालूनच लोक बाहेर पडत आहेत. बुधवारी अकोला येथे ४३.२, अमरावती ४१.८, बुलढाणा ३९.८, ब्रम्हपुरी ४१.८, गडचिरोली ४०.२, गोंदीया ४१.५, नागपूर ४२.१, वर्धा ४२.८, वाशिम ४२.५ आणि यवतमाळ येथे ४२ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.

हेही वाचलतं का?

Back to top button