Acid Attack : पतीनेच पत्नीवर केला अॅसीड हल्ला - पुढारी

Acid Attack : पतीनेच पत्नीवर केला अॅसीड हल्ला

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात एका महिलेवर ॲसिड हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरातील रामेश्वरी भागात ही घटना घडली आहे. मोटारसायकलवरून येत तिच्या पतीनेच हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले असून, या हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक केली आहे. (Acid Attack)

उपराजधानी नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज सकाळी सायकलने जात असलेल्या एका महिलेवर दुचाकीवरून आलेल्या एकाने ॲसिड सदृश्य द्रव्य फेकल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.

पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता अवघ्या काही तासात या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून, फिर्यादी महिलेचा नवरा असल्याची माहिती पुढे आली आहे.

Acid Attack : पती, पत्नीमध्ये वैयक्तिक कारणाने वाद

कौटुंबिक वादातून ते दोघेही वेगळे राहतात. त्याने बायकोला अद्दल घडवण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. आरोपी हा प्लंबर म्हणून काम करतो. पती आणि पत्नी मध्ये वैयक्तिक कारणाने नेहमी वाद होत असल्याने पती- पत्नी विभक्त राहतात. आज सकाळी पत्नी कामावर जात असताना आरोपीने ॲसिडसदृश द्रव्य तिच्या चेहऱ्यावर फेकून पळ काढला.

या हल्ल्यात जखमी असलेल्या पिडीत महिलेला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, भाजलेल्या जखमा काही वेळानंतर वाढू शकतात. त्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

आरोपी पती हा प्लम्बिंगचे काम करत असल्यामुळे त्याला बाथरूमचे नळ स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणार्‍या ॲसिडची माहिती होती. बायकोला धडा शिकवण्याच्या उद्देशाने त्याने तेच ॲसिड सदृश द्रव्य पत्नीच्या चेहऱ्यावर फेकून पत्नीला जखमी केले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

Back to top button