shivaji maharaj statue : आ. रवी राणांनी बेकायदेशीर बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवला | पुढारी

shivaji maharaj statue : आ. रवी राणांनी बेकायदेशीर बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवला

अमरावती ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बडनेराकडे जाणाऱ्या राजापेठ उड्डाणपुलावर जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आमदार रवी राणा यांनी १२ जानेवारीच्या मध्यरात्री कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थानापन्न केला होता. त्यामुळे शहरात मोठे राजकारण तापले होते. (shivaji maharaj statue)

मात्र, शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशासनाने रविवारी (१६ जानेवारी) पहाटे हा पुतळा तेथून काढला आहे. दरम्यान आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी पहाटे तीन वाजतापासून नजरकैदेत ठेवले होते. पहाटे पुतळा काढतेवेळी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोपही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

shivaji maharaj statue : कोरोना निर्बंध पायदळी

बंदोबस्तकुठलीही परवानगी नसताना राजापेठ उड्डाणपुलावर पुतळा बसवत त्याठिकाणी दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी युवा स्वाभिमान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली.

यादरम्यान कोरोना संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाकडून लावण्यात आलेले कोरुना निर्बंध देखील पायदळी तुडविण्यात आले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या शंकरनगर घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांच्या वतीने घेतली जात आहे.

भाजपकडून निषेध

राजापेठ उड्डाणपुलावर स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याच्या प्रकाराबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी ही कारवाई म्हणजे मोगलाई असल्याचे म्हटले आहे.

अमरावती शहरात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्शनी भागात पुतळा नाही. तसेच संभाजी महाराजांचाही पुतळा नाही. त्यामुळे राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कारवाई करणे हा प्रकार अतिशय निंदनीय असून आम्ही सरकारचा निषेध नोंदवतो, असेही शिवराय कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

महापालिकेने पहाटे केली कारवाई

महापालिका प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज सकाळी हटविण्यात आल्यामुळे युवा स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. राज्य शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का चालत नाही, असा सवालही यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांचा निषेध युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी नोंदविला.

Back to top button