नागपूर : एसटी कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन करण्यापूर्वी केला व्हिडीओ व्हायरल | पुढारी

नागपूर : एसटी कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन करण्यापूर्वी केला व्हिडीओ व्हायरल

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा

दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. काही संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. असे असले तरी काहींचे आंदोलन सुरूच आहे. अशातच नागपुरातील एका एसटी कर्मचाऱ्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज (मंगळवार) घडली. सुरेश दुधे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुरेश दुधे हे नागपूर शहरातील घाटरोड आगारातील कर्मचारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे तीन महिन्यांपासून पगार झालेला नाही. काही संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे, तर काही संघटनांचे अद्यापही आंदोलन सुरू आहे. यामुळे काय करावे आणि काय नाही, अशा मानसिकतेत आंदोलक आहेत.

अशात तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने आणि त्यांच्या शेतातील रस्ता दोन बिहारी व्यक्तींनी अडवून ठेवल्याने कर्मचारी पार निराश झाला होता. याची तक्रार केल्यानंतर तहसीलदार, पटवारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहकार्य न करता पैसे मागितल्याचा आरोप, सुरेश दुधे यांनी व्हिडीओमधून केला आहे.

कोणताही मार्ग निघत नसल्याने व काय करावे हे सुचत नसल्याने सुरेश यांनी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुरेश दुधे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओतून त्यांनी होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Back to top button