ठाणे : मिरा-भाईंदरमध्ये 16 कोटीतून साकारले पहिले म्युझिकल फाऊंटन

30 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण; स्क्रीनवर शहराचा इतिहास दाखविणार
म्युझिकल फाऊंटन
म्युझिकल फाऊंटनpudhari news network
Published on
Updated on

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील नवघर व काशिमीरा येथील जरीमरी या दोन तलावांमध्ये पहिल्यांदाच 16 कोटींच्या शासकीय खर्चातून म्युझिकल फाऊंटन बसविण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण येत्या सोमवार, दि. 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

ठाण्याच्या धर्तीवर मिरा-भाईंदर शहरातही म्युझिकल फाऊंटनची संकल्पना राबविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यावेळी भाईंदर पूर्वेकडील नवघर तलावासह गोडदेव तलाव व काशिमीरा येथील जरीमरी तलावात म्युझिकल फाऊंटन बसविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला मान्यता देत मुख्यमंत्र्यांनी म्युझिकल फाऊंटनसाठी 50 कोटींच्या निधीला मंजुरी देत हा निधी पालिकेकडे वर्ग केला.

या तिन्ही तलावांतील म्युझिकल फाऊंटनच्या कामाला सुमारे 8 महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. त्यापैकी नवघर व जरीमरी तलावांतील म्युझिकल फाऊंटनचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून गोडदेव तलावातील फाऊंटनचे काम देखील लवकरच पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, दोन तलावांतील फाऊंटनची चाचणी दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर त्यांचे लोकार्पण सोमवार, दि. 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्युझिकल फाऊंटनचा असा असेल शो

दररोज रात्री 7, 8 व 9 या तीन वेळेत लोकांना पाहता येणार आहे. या म्युझिकल फाऊंटनवर वॉटर स्क्रीन तयार होऊन त्यावर ऑडिओ व व्हीडिओ कन्टेन्ट म्हणजेच पाच-पाच मिनिटांचे शो दाखवले जाणार आहेत. या वॉटर स्क्रिनवर छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री रामाची छबी, मंदिर व मिरा-भाईंदर शहराचा इतिहास दाखविला जाणार आहे.

पाणी प्रदूषणविरहित राहणार

स्वातंत्र्य दिन, दिवाळी, गणेशोत्सव आदी महत्वाच्या दिवशी फाउंटनचे रंग बदलणार असून त्या रंगातील व म्युझिकवर नाचणारे फाऊंटन लोकांना पाहायला मिळणार आहेत. या फाऊंटनची सुरुवात देशभक्ती, भक्ती संगीताने किंवा प्रत्येक दिन विशेषाप्रमाणे केली जाणार आहे. शहरात पहिल्यांदाच म्युझिकल फाऊंटन बसविण्यात आल्याने या तलावांचे स्वरूप बदलले असून शहराच्या सौंदर्यात भर पडल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या म्युझिकल फाऊंटनमुळे तलावांतील पाण्याचे प्रदूषण होणार नसून त्यातील जलचरांवरही त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण या तलावांतील पाणी नेहमी प्रदूषणविरहित राहील याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वॉटर, फायरचा संगम एकाचवेळी...

राज्यात पहिल्यांदाच नवघरच्या तलावात म्युझिकल फाऊंटनसोबत फायर नोझल लावण्यात आला असून म्युझिकल फाउंटन सुरू असताना काही नोझलमधून फायर सोडण्यात येणार आहे. यामुळे लोकांना वॉटर व फायरचा संगम एकाचवेळी पाहता येणार आहे. तसेच या तलावाच्या परिसरात अम्पी थिएटर बांधण्यात आले असून तेथे एकाच वेळी 500 लोक बसून तलावातील म्युझिकल फाऊंटन शो बघू शकणार आहेत. जरीमरी तलावात बसविण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटनची रंगसंगती दिवसाप्रमाणे व दिन विशेषाप्रमाणे बदलू शकणार असून त्यात तशी व्यवस्था करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news