ठाणे : मिरा-भाईंदरमध्ये एमआयडीसीकडून शटडाऊन

पाण्याच्या अप्रत्यक्ष पाणीकपातीवर लोकप्रतिनिधी बनले मौनी
मिरा-भाईंदर
मिरा-भाईंदर file photo
Published on
Updated on

भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला सततच्या शटडाऊनच्या नावाखाली पाणीकपात लागू केली जात असल्याने अनेक भागांतील लोकवस्त्यांमध्ये पाण्याची कृत्रिम समस्या उद्भवत आहे. यामुळे नागरिक त्रस्त असतानाही पाण्याच्या अप्रत्यक्ष पाणीकपातीच्या समस्येवर शहरातील लोकप्रतिनिधी मौनी बनल्याचे दिसून आले आहे.

मिरा-भाईंदर शहर पाण्याच्या स्रोतापासून सुमारे 50 किलो मीटरहून अधिक अंतरावर असून शेवटच्या टोकावरील मिरा-भाईंदर शहराला सरकारी कोट्यातून उपलब्ध होणारे पाणी तब्बल 36 तासांनी उपलब्ध होते. त्यातच तांत्रिक दुरुस्तीच्या नावाखाली शटडाऊन झाल्यास दुरुस्तीनंतर सुरु केला जाणारा पाणीपुरवठा शहराला सुरुळीतपणे उपलब्ध होण्यास सुमारे दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. दरम्यान शहराला कमी प्रमाणात तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. यात पाण्याची कृत्रिम समस्या उद्भवत असल्याने अनेक भागांमधील लोकवस्त्यांना पुरेसे पाणी मिळत नाही.

पावसाळ्यात मात्र पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुधारत असल्याचे मानले जाते. यंदा मात्र परिस्थिती बदलल्याचे दिसून आले आहे. यंदा जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला असला तरी पाणीकपातीसाठी पाणीपुरवठ्याचा शटडाऊन काही केल्या शहराची पाठ सोडत नसल्याचे समोर आले आहे. शहराला स्टेम प्राधिकरण व एमआयडीसीकडून अनुक्रमे 121 व 86 असा एकूण 207 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यातील मंजूर कोट्याप्रमाणे शहराला पूर्णपणे पाणीपुरवठा कधीच केला जात नाही.

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला असताना एमआयडीसीकडून शुक्रवार, दि. 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान बारवी वॉटर वर्क्स येथे पंप स्ट्रेनर्स आणि ग्रिल साफ करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा 5 तासांकरीता खंडित करण्यात आला. या शटडाऊनच्या नावाखाली शहराला अप्रत्यक्षपणे पाणीकपात लागू करण्यात आल्याचे दिसून आल्याचे वृत्त दैनिक पुढारीने शनिवार, दि. 14 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले.

एमआयडीसीकडून गुरुवार, दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 20 सप्टेंबर सकाळी 9 वाजेदरम्यान 24 तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. या दरम्यान शहराला एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा 24 तास खंडीत केला जाणार असल्याने या सततच्या शटडाऊनच्या नावाखाली अप्रत्यक्षपणे लागू होणार्‍या पाणी कपातीमुळे शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीं दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. या अप्रत्यक्ष पाणी कपातीमुळे शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यास नागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news