

ठाणे : ठाणे महापालिका कर्मचार्यांच्या विविध समस्यांबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेत घेतलेल्या अधिकार्यांच्या बैठकीत केलेल्या चर्चेनुसार अनेक समस्या मार्गी लागल्या असून सुमारे साडेपाच हजार कर्मचार्यांना जूनच्या पगारासोबत प्रत्येकी 60 हजार रुपये वाहतूक भत्त्याचा फरक मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
2 जानेवारीरोजी स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपायुक्त (मुख्यालय) जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त (आरोग्य विभाग) उमेश बिरारी, उपायुक्त (सुरक्षा विभाग) सचिन सांगळे आणि कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप उपस्थित होते.
या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्यांना प्रवास भत्त्याची फरकाची रक्कम अदा करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यावर संबंधित अधिकार्यांनी निधीच्या उपलब्धतेनुसार भत्त्याचा फरक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. याबाबत केळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जून महिन्याच्या पगारासोबत अधिकारी कर्मचार्यांना फरकाची रक्कमही देण्यात आली. सुमारे साडेपाच हजार कर्मचार्यांना प्रत्येकी 60 हजाराची रक्कम मिळाल्याने पालिका वर्तुळात उत्साहाचे वातावरण झाले आहे.
वाहतूक भत्त्याचा फरक, सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा आणि तिसर्या हप्त्याचा फरक, तसेच 2016 नंतरच्या कर्मचार्यांचा सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते, पाच वर्षे रखडलेली ड-वर्ग पदोन्नती, पीएफ डीसीपीएसच्या पावत्या देणे, 10,20,30 वर्षे सेवा झालेल्या अधिकारी-कर्मचार्यांना आश्वासीत प्रगती योजना लागू करणे, वारसा अनुकंपांच्या नियुक्ती देणे, ए. एन. एम. प्रसाविका पदाची पदोन्नती तसेच वेतन त्रुटी, कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करणे, या व अशा अनेक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात येऊन केळकर यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या होत्या. केळकर यांनी बैठकीनंतर देखील या प्रश्नांची तड लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवल्याने या सूचनांची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने होत असल्याने कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.