

ठाणे : ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. तिला आता सुधारावेच लागेल. अधिकारी वर्गाने तिला पोखरून टाकले. गोल्डन गँगच्या लीडरने ठाण्याचे वाटोळे केले आहे, या भ्रष्टाचारापासून रोखण्यासाठी, आणि ठाणे महापालिकेतील दरोडेखोरांना रोखण्यासाठी तसेच ठाणेकरांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा नारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धडक मोर्च्याच्या निमित्ताने दिला. तसेच यावेळी महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले.
ठाणे महापालिका हद्दीतील विविध प्रश्नावर सोमवारी उद्धव सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यावतीने धडक मोर्चा महापालिकेवर काढला. आला. या मोर्चानंतर महापालिका मुख्यालयाजवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक संयुक्त सभा पार पडली. यावेळी उपस्थित नेत्यांनी भ्रष्टाचार विरोधाचा सूर आवळला.
या मोर्चात उद्धव सेनेचे नेते भास्कर जाधव, माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हा प्रमुख महिला वैशाली दरेकर, दीपेश म्हात्रे, मनसेचे नेते अभिजित पानसे, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष मनोज प्रधान आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते राहुल पिंगळे आदींसह मोठया संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शहरातील वाहतूककोंडी, रस्त्यावरील खड्डे, पाणी समस्या, अनधिकृत बांधकाम, भ्रष्टाचार,एका एका विभागात अधिकारी काम करत असून त्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत आदींसह इतर मुद्यांवरून आयुक्त सौरभ राव यांना धारेवर धरले.
सचिन बोरसेकडून निवडणूक विभाग काढणार
काही विभागात आजही भ्रष्ट अधिकारी काम करत आहेत. निवडणूक विभागात कार्यरत असलेले सचिन बोरसे याला हटवा, त्यांची बदली का केली जात नाही असा सवाल केला असता त्यांची बदली केली जाईल असे आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी दिले. मतदान यादीवर काम सुरू आहे मात्र त्यात काही घोळ झाला, बोगस मतदार घुसविले तर यावेळी त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही असा इशारा माजी खासदार राजन विचारे यांनी दिला. मनपा मधील शहर विकास विभागात सुरू असलेला घोटाळा तुम्हाला माहित नाही का असे अनेक सवाल करून महाविकास आघाडीच्या नेत्यानी आयुक्तांना भांबावून सोडले.
आयुक्त हतबल नाहीत, तर राज्यकर्त्यांचे बटिक झाले आहेत. ठाणे मनपा ही सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. जर भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेवर ठेवले, तर पुढची पिढी माफ करणार नाही. पाणी समस्या, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकाम या सर्व बाबतीत आम्ही लढा देणार आहोत.
भास्कर जाधव, उद्धव सेना नेते
राजकिय एकत्रीकरण दाखवण्यासाठी हा मोर्चा नव्हता, ठाणेकरांच्या समस्या घेऊन आम्ही पुढे आलो आहे. ठाणेकरांना जाणवत असलेल्या समस्याचा पाढा आम्ही आयुक्तांपुढे मांडला आहे. प्रत्येक गोष्टीत बजबज पुरी, भ्रष्टाचार वाढत जात आहे. यातून सुटका होणार आहे का? टेंडर काढताना आधी पैसे किती मिळणार याचा हिशोब आधी होतो. हे रोखण्यासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत.
अभिजित पानसे, मनसे नेते
“ठाणेकरांच्या मनात आक्रोश आहे. ठाण्याला भ्रष्टाचारापासून वाचवायचे असेल तर आम्ही एकत्र येणारच. शाही धरण आजही अपूर्ण आहे, कारण टेंडर कोण काढणार यावरच राजकारण सुरू आहे. ठाणेकर तहानलेले आहेत आणि वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. मी जाहिर आव्हान देतो की, ठाणे महापालिकेतील पदावरची अधिकारी योग्य आहेत का हे आयुक्तांनी जाहीर करावे आणि त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा.
जितेंद्र आव्हाड, आमदार शरद पवार गट
राज्यभर भ्रष्टाचार वाढला असून ठाणे त्यात अग्रेसर झाले आहे. मनपाचे पाच वर्षांचे ऑडिट झालेले नाही, 337 कोटींचा हिशेब लागत नाही. गोल्डन गँगने महापालिका गिळून टाकली आहे. दिल्लीत गेल्यानंतर काहींना ठाणे महापालिका आजही सुटत नाही आजही दिवाळीच्या निमित्ताने गोल्डन गँगचे लीडर आले होते. याच गोल्डन गँगने ठाणे महापालिका गिळून खाल्ली आहे, हाच गोल्डन गॅंगचा लीडर एकनाथ शिंदे यांच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाणार होता. त्याला मी समजावून सांगितले. तोच गद्दार महापौर झाला, मात्र याच गद्दाराने मनपाचे वाटोळे केले आहे.
राजन विचारे, माजी खासदार - उद्धव सेना