

ठाणे: वडाळा-कासारवडवली मेट्रोसाठी मोगरपाडा येथील नियोजित कारशेडसाठी शेतकर्यांची संपादित केलेली जमीन आणि त्याबदल्यात शेतकर्यांचा वाद न्यायालयात गेल्याने कारशेडचे काम रखडले. न्यायालयीन लढाई एमएमआरडीने जिंकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आज बाधित शेतकर्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली आणि पुढील रणनीती ठरविण्यात आली. त्यानुसार वर्ग 1 ची जमीन आणि अन्य मागण्या शेतकर्यांच्या पदरात पडाव्यात यासाठी शासनस्तरावर आणि अधिवेशनात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोगरपाडा येथील कारशेडबाधित शेतकर्यांनी गुरुवारी आमदार संजय केळकर यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. शासनाकडून मिळणार्या मोबदल्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा शेतकर्यांनी पुनरुच्चार केला. 167 शेतकर्यांना मोबदला म्हणून 80 वर्षांच्या कराराने जमिनी न देता वर्ग 1 च्या जमिनी देण्यात याव्यात, 14.4 टक्केसह दोन एफएसआय देण्यात यावा तसेच देण्यात येणार्या जमिनीचा अधिकृत नकाशा आणि सातबारा देण्यात यावा, असे निर्णय सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आले होते. या मागण्यांची पूर्तता व्हावी, असे साकडे शेतकर्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे घातले.
याबाबत केळकर यांनी शेतकर्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनातही या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे केळकर म्हणाले.
बाधित शेतकर्यांचा विकासाला विरोध नसून त्यांना न्याय-हक्क हवा आहे. हे सरकार शेतकर्यांचे सरकार असून बाधित शेतकर्यांसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला. शेतकर्यांच्या न्याय-हक्कासाठी नेहमी पाठीशी उभे राहिल्याबद्दल शेतकर्यांनी केळकर यांचे आभार मानले.