

कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी ते पत्री पूल मार्गावरील नाल्यावरील पूल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. पुलाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे पुलावरील रस्ता अक्षरशः धुवून गेला असून, काँक्रीटचा थर उखडल्याने आतल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले असून या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या पुलाबाबत चिंता व्यक्त करत तत्काळ डागडुजी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गोविंदवाडी बायपास ते पत्रीपुलाकडे जाणार्या पुलावर दिवस-रात्र अवजड वाहनांची मोठी वाहतूक सुरू असते. हा पूल भिवंडी, ठाणे, नाशिक, मुंबईकडून येणार्या आणि डोंबिवली, पनवेल, वाशी, तुर्भे, पुण्याकडे जाणार्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. दिवस-रात्र या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ट्रक, कंटेनर, मालवाहू वाहने व खासगी वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे पुलाची झीज अधिक गतीने होत आहे. अशा स्थितीत पुलाची सध्याची अवस्था एखाद्या गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकते.
पुलाची रचना कमकुवत झाली असून, यामुळे तो कोसळण्याचा धोका अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. पुलाच्या उघड्या सळ्या, खचलेली काँक्रीटची पृष्ठभाग आणि खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दररोज शालेय वाहने, सार्वजनिक बस, ट्रक, मालवाहतूक करणारी अवजड वाहने याच मार्गाने जात असल्याने हजारो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
अनेकदा याबाबत तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. पुलाची नियमित देखभाल न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप होत आहे. या पुलाची स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीची मागणी शहरवासीयांकडून जोर धरू लागली आहे. महानगरपालिने तत्काळ दुरुस्ती, स्ट्रक्चरल तपासणी व वाहतूक नियंत्रण यंत्रणा उभी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कल्याण शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या नाल्यावरील पुलाची अवस्था गंभीर आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास जीवितहानीसारखी मोठी दुर्घटना घडू शकते. पुलाची डागडुजी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करणे आता अत्यंत गरजेचे आहे.
रमाकांत म्हात्रे, दक्ष नागरीक