

डोंबिवली : जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या आदेशानुसार कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी तरूणाईला व्यसनाधीन करणाऱ्यांचे मनसुबे उध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. अंमली पदार्थांची तस्कारी करून राज्याच्या विविध भागातील तरूणाईला व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या गुफरान हन्नान टोळीचा कल्याणच्या पोलिसांनी कणा मोडून काढला आहे. या टोळीचा म्होरक्या गुफरान हन्नान शेख (२९) यांच्यासह १७ तस्करांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टोळीचा म्होरक्या गुफरान हन्नान शेख (२९, टिटवाळा, ता. कल्याण), बाबर उस्मान शेख (२७, रा. दर्गा रोड, बनेली, आंबिवली), सुनिल मोहन राठोड (२५, रा. संभाजी नगर, म्हाडा कॉलनी, बदलापूर - प.), आझाद अब्दुल शेख (५५, रा. जोहोराबाई चाळ, नविन भेंडी पाडा, बदलापूर रोड, अंबरनाथ - प.),रेश्मा अल्लाउद्दीन शेख (४४, रा. वाडीबंदर झोपडपट्टी, जे. एम. राठोड मार्ग, बीपीटी कॉलनी, एकता माझगाव - मुंबई, सद्या रा. मुंब्रा-पनवेल रोड, उत्तरशिव), शुभम उर्फ सोन्या शरद भंडारी (२६, रा. संस्कृत कॉलनी, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे), असिफ अहमद अब्दुल शेख (२५, रा. जनता नगर, मानखुर्द कलेक्टर चाळ, मुंबई), सोनू हबिब सय्यद (२४, रा. जनता नगर, नुरी मस्जीद मानखुर्द, मंडाळा, मुंबई), प्रथमेश हरिदास नलवडे (२३, रा. चाकुरे, माळशिरस सोलापूर), रितेश पांडूरंग गायकवाड (२१, रा. आनंदनगर, माळशिरस, सोलापूर), अंबादास नवनाथ खामकर (२५, रा. सराटी गांव, इंदापूर, जि. पुणे), आकाश बाळू भिताडे (२८, रा. चाकुरे, माळशिरस, सोलापूर) आणि योगेश दत्तात्रय जोध (३४, रा. चंद्रनगर सोसायटी, इंदिरानगर, जुळे सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीतील अजून चारजण फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मोक्का लावण्याची ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील ही पहिली मोठी कारवाई मानली जाते. या १७ गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख गुफरान हन्नान शेख हा टिटवाळ्या जवळच्या बनेली गावात चोरी-छुपे राहत असतो. तो हाती लागणे कठीण होते. मात्र पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार पोलिसांच्या एका पथकाने टोळीचा म्होरक्या गुरफान हन्नान याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी विरोधी कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आंध्रप्रदेश, विशाखापट्टणम् आणि सोलापूर भागातून एकूण १३ जणांना दोन महिन्यांपूर्वी अटक केली होती. या टोळीकडून ६२ किलो गांजासह शस्त्रे देखिल हस्तगत करण्यात आली होती. या १३ आरोपींची चौकशी असताना पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ११५ किलो गांजा, तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी महागडी वाहने, स्वसंरक्षणासाठी बेकायदा पिस्तूल असा एकूण ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.
ही टोळी आंध्रप्रदेश भागातील दुर्गम भागात पिकवला जाणारा गांजा खरेदी करून तो साखळी पद्धतीने विशाखापट्टणमसह महाराष्ट्राच्या ठाणे, कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे भागात वितरण आणि विक्री करत होती. अंमली पदार्थांच्या तस्करीतून ही टोळी कोट्यवधी रूपयांचा बेकायदा व्यवहार करत होती. तरूणाई प्रामुख्याने गांजाच्या आहारी जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीचे मूळ उखडून काढण्यासाठी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या टोळीला मोक्का लावण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना पाठविला होता. पोलिस आयुक्तांनी देखिल तरूणाईला व्यसनाधीन करणाऱ्यांचा कणा मोडून काढण्यासाठी त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. या टोळीतील पाच जणांविरोधात विविध पोलिस ठाण्यांत २१ गुन्हे दाखल आहेत. गेल्या तीन वर्षांपासून १७ जणांची टोळी आंध्रप्रदेशातून गांजा आणून महाराष्ट्राच्या विविध भागात चोरट्या मार्गाने विकत होती. या गुन्ह्याचा चौकस तपास सहाय्यक कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे करत आहेत.