ठाणे जिल्ह्यामध्ये 87 दरडप्रवण क्षेत्र असून त्यामध्ये दोन लाख 75 हजार 960 लोक हे पावसाळ्यात आपले जीव मुठीत धरून जगत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या दरडग्रस्त भागातील स्थलांतरित होणार्या लोकांसाठी 73 हजार 840 क्षमतेची व्यवस्था केलेली आहे. दरम्यान, या सर्व दरडग्रस्त भागांचे सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात दरवर्षी दरड कोसळून अनेक अपघात होतात, शेकडो लोकांना स्थलांतरीत केले जाते. वाहतूककोंडी होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी धोकादायक आणि दरडग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून त्यानुसार सुरक्षिततेची काळजी घेतली जाते.
ठाणे जिल्ह्यात 87 भागात दरड कोसळल्याची शक्यता असून दरड कोसळून सुमारे 2 लाख 75 हजार 970 लोक बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ठाणे तालुक्यातील कळवा येथील सुमारे 62 हजार, मुंब्रा सुमारे 75 हजार भिवंडी सुमारे 30 हजार, नेतिवली टेकडी 17 हजार, कचोरे 17 हजार यासह वागळे , वर्तकनगर येथील संभाव्य बाधितांची संख्या अधिक आहे.
संभाव्य दरड कोसळल्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विस्थापित होणार्या लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी 73 हजार 840 क्षमता असलेले केंद्र सज्ज ठेवलेली आहेत. दुसरीकडे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील सर्व्हेनंतर ठाणे जिल्ह्यातील दरडींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार अतिधोकादायक दरड प्रणव भागाकडे विशेष लक्ष देऊन लोकांना सुरक्षितस्थळी हलविले जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
विस्तारलेल्या आणि लोकसंख्येचा विस्फोट होत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी 24 तास प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद सेवा सुरु केली जाणार आहे. या यंत्रणेचे वैशिष्ट्य म्हणजे जीआयएस सेवेसह व्हॉईस कॉल, एसओएस, एसएमएस, ईमेल, वेब विनंती किंवा पॅनिक बटणाचा वापर करून मदतीसाठी विनंती करा, कॉलर/पीडित व्यक्ती जिथे असेल, त्या ठिकाणाचा स्वयंचलित मागोवा, नजीकच्या आपत्कालीन प्रतिसाद वाहनातून तातडीने सहाय्य उपलब्ध, आपत्कालीन प्रतिसाद वाहनांचा थेट मागोवा, मध्यवर्ती नियंत्रण केंद्राद्वारे आपत्कालीन सेवा समन्वय, आपत्कालीन परिस्थितीत झटपट निर्णय, परिणामी कमी वेळात प्रतिसाद शक्य होणार आहे.