२७ गावांतील ग्रामस्थांची अंधारातील चाचपड संपुष्टात; दिवाळीच्या मुहूर्तावर १४० रस्ते झाले प्रकाशमान

Thane latest news: २७८९ पोलवर केडीएमसीकडून पथदिव्यांची व्यवस्था
Thane news
Thane news
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांतील रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रूपयांच्या निधीची तरतूद झाल्यानंतर रस्त्यांची बांधकामेही वेगाने सुरू आहेत. रस्त्यांच्या बांधकामांसाठी निधी खेचून आणणाऱ्या या भागाचे तत्कालीन आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी २७ गावांतील रस्त्यांच्या दुतर्फा पथदिवे बसविण्याच्या मागणीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा लावला होता.

या पाठपुराव्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाकडून मंजूर झालेल्या २७ कोटी ९० लाख रूपयांच्या निधीतून २७ गावांतील १४० रस्ते उजळून निघाले आहेत. केडीएमसीने दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या २७८९ पोलवर पथदिवे (एलईडी) बसविल्यामुळे रस्ते उजळून निघाले आहेत.

२७ गावांमधील कल्याण पूर्व आय-९प्रभाग क्षेत्रातील नांदिवली, वसार, माणेरे, भाल, पिसवली, चिंचपाडा, आशेळे, आडिवली-ढोकळी, डोंबिवली पूर्वेकडील ई /१० प्रभाग क्षेत्रातील भोपर, कोपर, देसलेपाडा, लोढा-हेरीटेज, संदप, उसरघर, मानपाडेश्वर मंदिर, संदप, रिजन्सी, घारीवली, काटई, आयरेगाव, मानपाडा रोड, उंबार्ली, पाईपलाईन रोड, कोळेगाव, हेदुटणे, घेसर, निळजेगाव, सोनारपाडा, सांगाव, सांगर्ली, देसलेपाडा, नांदिवली मिलापनगर आणि आजदेगाव परिसरात अंतर्गत रस्त्यांवर हायमास्ट वगळून एलईडी बल्बचे पथदिवे बसविण्यात आले असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

२०७ रस्त्यांवर ४६७९ पोलसह ५२३५ पथदिवे

२७ गावे २०१५ सालात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्यानंतर या गावांमध्ये नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदिवे व्यवस्था नव्हती. तसेच काही रस्त्यांवर असलेली पथदिवे व्यवस्था देखील तांत्रिक दृष्ट्या सक्षम नव्हती. महापालिकेच्या अंदाजपत्रकामधून काही रस्त्यांवर पथदिवे व्यवस्था केली. तथापी ती पुरेशी नव्हती. सन २०२३ मध्ये २७ गावांमध्ये नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पथदिवे व्यवस्था करण्यासाठी २७ कोटी ९० लाख रूपये निधीची मागणी तत्कालीन आमदार राजू पाटील यांच्यासह केडीएमसीने नगरविकास विभागाकडे केली होती.

सन २०२४ मध्ये शासनाने १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार २७ कोटी निधी मंजूर केला. २७ गावांमधील २०७ रस्त्यांवर ४६७९ पथदिव्यांचे पोल व ५२३५ पथदिवे व्यवस्था करण्यासाठी ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन ऑक्टोबर २०२४ मध्ये कामास सुरूवात केली. अभिनव गोयल यांनी महापालिका आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर २७ गावांतील पायाभूत सुविधांबाबत विशेष लक्ष देऊन तातडीने विकासकामे हाती घेण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिले होते.

३१ डिसेंबरपर्यंत सर्वत्र लखलखाट

२७ गावांतील पथदिव्यांच्या कामाचा आढावा आयुक्त स्तरावर वेळोवेळी झाल्याने या गावांतील पथदिव्यांच्या कामांना गती मिळाली. २७ गावांतील २०७ रस्त्यांपैकी १४० रस्त्यांवरील एकूण २८०० पथदिवे कार्यान्वित केल्यामुळे २७ गावांतील रस्ते पथदिव्यांनी उजळल्यामुळे खऱ्या अर्थाने दीपावली साजरी झाली. उर्वरित ६७ रस्त्यांवरील पथदिवे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याची माहिती विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news