पुन्हा तेंडुलकर

विजय तेंडुलकर यांचं त्या काळात अतिशय गाजलेलं सखाराम बाईंडर हे नाटक पुन्हा रंगमंचावर
Sakharam Binder play
पुन्हा तेंडुलकर pudhari photo
Published on
Updated on

डॉ. महेश केळुसकर

विजय तेंडुलकर यांचं त्या काळात अतिशय गाजलेलं सखाराम बाईंडर हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलेलं आहे आणि बऱ्यापैकी गर्दीही खेचत आहे. अनुभवी आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे या नाटकात सखारामची भूमिका करत आहेत. निळूभाऊ फुले ही भूमिका करायचे आणि या नाटकामुळेच खऱ्या अर्थाने त्या काळात राष्ट्रीयस्तरावर, कसलेले अभिनेते म्हणून निळूभाऊंची प्रसिद्धी झाली. कमलाकर सारंग यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं आणि लालन सारंग यांनी चंपाची भूमिका केली होती. आता अभिजीत झुंजारराव यांनी हे नाटक नव्याने दिग्दर्शित केलं आहे आणि त्यात अनुष्का विश्वास चंपाची भूमिका करतात.

मार्च महिन्यात 1972 साली सखाराम बाईंडर पहिल्यांदा रंगमंचावर आलं आणि ते तत्कालीन सामाजिक नीतिमूल्यं तसंच विवाहसंस्थेवर प्रश्नचिन्हे उपस्थित करणारं असल्यामुळे वादग्रस्त झालं. या नाटकाविरुद्ध मोर्चे निघाले, ते बंद करा म्हणून आंदोलनं झाली. तेंडुलकरांवर टीकेची झोड उठली आणि 13 प्रयोगांनंतर त्यावेळी सेन्सॉर बोर्डाने बाईंडर बंद करण्यासंबंधी आदेश जारी केला. कमलाकर सारंग आणि लालन सारंग यांना अनेक आर्थिक आणि मानसिक संघर्ष प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. सारंग कोर्टात गेले आणि नाटकावरची बंदी उठवण्यात यावी, असा आदेश घेऊन आले.

कोर्टातला लढा त्यावेळी ते जिंकले तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सखाराम बाईंडरचा प्रयोग दाखवावा लागला आणि त्यांच्या संमतीनंतरचं नाटक पुन्हा सुरू झालं. आता अनेक वर्षांनंतर ते पुन्हा रंगमंचावर आलं आहे. तथापि त्यावेळची सामाजिक व राजकीय परिस्थिती आज राहिलेली नसल्यामुळे अजूनपर्यंत तरी त्याचे प्रयोग सुरळीत होत आहेत आणि ते तसेच चालू राहावेत, अशी मराठी नाट्यरसिक प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

लेखक म्हणून तेंडुलकर एक गुंतागुंतीचे आणि साहसी व्यक्तित्व होतं. ते अव्वल दर्जाचे प्रतिभावंत तर होतेच पण आपल्याला जे म्हणायचं आहे, ते ठामपणे म्हणणारे लेखक होते. तेंडुलकर जेव्हा नाटककार म्हणून फारसे प्रसिद्ध झाले नव्हते. तेव्हा त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या. अनुवादाची कामं केली. सदर लेखन केलं. त्यापैकी त्या काळात सर्वात गाजलेलं त्यांचं सदर म्हणजे माणूस साप्ताहिकातील रातराणी. माणूस पुण्याहून निघायचं.

श्री. ग. माजगावकर त्याचे संपादक होते आणि त्यांचे बंधू (आणि सध्याचे मोठे प्रकाशक) दिलीप माजगावकर सहाय्यक होते. त्या काळात तेंडुलकर चौगुले हाऊसमध्ये नोकरीला होते. दिलीप माजगावकर तेंडुलकरांना बोरीबंदर स्टेशन समोरच्या एक्सेलसियर हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटले आणि तेथे रातराणी या सदराबद्दल त्यांची चर्चा झाली. रातराणीच्या पहिल्या लेखाचं शीर्षक होतं -

एक युग : एक पर्व. त्यामध्ये बालगंधर्वांचं परलोकी जाणं आणि विजया मेहता थोड्या काळाकरिता नाट्यशिक्षणासाठी परदेशात जाणं या दोन घटना तेंडुलकरांनी विलक्षण कल्पकतेनं जोडून घेतल्या होत्या. या पहिल्याच लेखापासून रातराणी हे सदर गाजू लागलं आणि पुढचे सर्व लेख चढत्या क्रमाने वाचकांच्या पसंतीची टाळी घेत गेले. सर पॉल मुनी, सुलोचनाबाई, आचार्य रजनीश, लॉरेल हार्डी, तुघलक असे एकाहून एक सरस लेख तेंडुलकरांनी रातराणीसाठी लिहिले.

आपल्या समकालीनांबद्दल तेंडुलकरांचे काही गैरसमज आणि पूर्वग्रह होते. महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक गोविंद तळवलकर यांना ते उपरोधाने महाराष्ट्रातले प्रसिद्ध विचारवंत असं म्हणायचे. माजगावकरांना याचा एकदा अनुभव आला. आणीबाणीच्या काळात कराडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी दुर्गाबाई भागवतांनी बाणेदार भूमिका घेतली. त्यावेळी अनेक साहित्यिकांचे खरे-खोटे मुखवटे गळून पडले. पण, तेंडुलकर कराड संमेलनापासून अलिप्त होते.

नंतरच्या एका भेटीत ते माजगावकरांना म्हणाले की, “ दुर्गाबाईंनी एक सोन्यासारखी संधी वाया घालवली. दुर्गाबाईंनी तो मूळ ठराव सर्वांसमोर येऊ दिला? ठामपणे मांडला? फार तर काय झालं असतं? दंगल झाली असती, संमेलन उधळलं गेलं असतं. पण पुढे आम्ही नातवंडांना हे सगळं अभिमानानं सांगितलं असतं की, एक संमेलन असं उधळलं गेलं. पण दुर्गाबाईंनी ही संधी हातची घालवली.” तेंडुलकरांचे रागलोभ तीव्र होते. पु. ल. गेले तेव्हाही मराठी दैनिकांना आपली प्रतिक्रिया देण्याचं त्यानी टाळलं आणि हिंदूमध्ये छोटेखानी श्रद्धांजली लेख लिहून विषय संपवला. पु. ल. ना ते साहित्यिक म्हणून मानायला तयार नव्हते. चतुरंगचा जीवन गौरव पुरस्कार श्री. पु. भागवत यांनी मनोहर जोशी यांच्याकडून घेऊ नये म्हणून तेंडुलकरांनी आवाज उठवला. तेंडुलकर तसे व्यवहार सांभाळणारे होते. पण, प्रवाहाविरुद्ध पोहायलाही त्यांना आवडत होतं.

‌‘शांतता कोर्ट चालू आहे...‌’ या नाटकाला कमलादेवी पुरस्कार मिळाला आणि विजय तेंडुलकर हे नाटककार म्हणून राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. त्यानंतरचा त्यांचा नाटककार म्हणून प्रवास स्तिमित करणारा आणि विलक्षण चढ-उतारांचा असा होता. मराठी नाटक आणि तेंडुलकर राष्ट्रीय, आंतररष्ट्रीय पातळीवर गेले. त्यामागे तेंडुलकरांची प्रतिभा तर होतीच, पण विलक्षण कष्टही होते. गिधाडे, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल या नाटकांनी इतिहास घडवला. त्यावरची वादळं, मोर्चे, आंदोलनं, कोर्ट-कचेऱ्या, हाणामाऱ्या, परदेश दौरे यामुळे तेंडुलकर हे नाव सर्वतोमुखी झालं.

सखाराम बाईंडर या नाटकाचे प्रयोग त्या काळात अमेरिकेतही झाले. त्यानिमित्ताने तेंडुलकरांनी अमेरिकेचा दौरा केला. एकदा या दौऱ्याचा विषय माजगावकरांशी बोलताना निघाल्यावर तेंडुलकर म्हणाले, “ परवा अमेरिकेचा दौरा करून परतलो, पण मन लागलं नाही. त्या दौऱ्यात खूप अस्वस्थ होतो. आज अमेरिकेत सखारामचे प्रयोग चालू आहेत. मला पैशाची गरज आहे. सखाराम मला थोडे पैसे देतोय. तेवढाच तो मला महत्त्वाचा. एरव्ही माझा सखाराम मी लिहिल्यानंतर दोन-तीन वर्षानंतरच मरायला हवा होता. तो तीस वर्ष का जगला? अजूनही का कोणाला करावासा वाटतोय? मला कळत नाही. माझं सगळं लेखन हे आतलं बाहेर टाकण्यासाठीच्या एका उर्मीतून झालेलं लेखन आहे. त्याला आजच्या जगण्याचे संदर्भ आहेत. उद्या ते लेखन संदर्भहीन झालं, तर मला आवडेल. माझ्यानंतर माझ्यामागे त्यातलं काही राहायला नकोय.”

तेंडुलकरांनी असं जरी म्हटलं असलं तरी सखाराम बाईंडरआज 53 वर्षांनंतरही जिवंत आहे. तो कुणाला तरी करावासा वाटतोय आणि लोकांनाही बघावासा वाटतोय. तेंडुलकरांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे तो मेला नाही. 53 वर्षांनंतरही अजून तेंडुलकरांचा सखाराम जिवंत आहे, हे त्यांचं यश म्हणायचं की, आपल्या समाज व्यवस्थेचं अपयश?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news