

नेवाळी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण प्रश्नी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिपुत्रांमध्ये संतापली लाट उसळली आहे. विमानतळाला भूमिपुत्रांच्या लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. नुकतेच या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण केले आहे. यावेळी पंतप्रधान दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र नामांतरणावर कोणतेही भाष्य न झाल्याने भूमिपुत्रांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. 3 डिसेंबरला महामोर्चाचे आयोजन भूमिपुत्रांनी केले असल्याची माहिती आगरी साहित्यिक सर्वेश तरे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
विमानतळाच्या नामकरण प्रश्नी दिघा येथे झालेले भूमिपुत्र सामाजिक संस्थांच्या ‘राष्ट्रीय नेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामांतर आंदोलन नियोजन बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर तीन महिन्यांत निर्णय होईल असे सांगितले होते. दरम्यान भूमिपुत्रांनी सुरू केलेली आंदोलनाची जय्यत तयारी भाजपासाठी अत्यंत डोकेदुखीची ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण प्रश्नी होणाऱ्या महामोर्चाच्या तयारीसाठी तालुकास्तरीय मेळावा भूमिपुत्रांचा घेतला जाणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विमानतळाच्या नामकरणाचा संघर्षातील प्रत्येक भूमिपुत्र या मेळाव्यांमध्ये सहभागी होणार आहेत. तालुकास्तरीय मेळाव्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या समस्यांवर आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या महामोर्चाचे ठिकाण आणि वेळ भूमिपुत्रांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. त्यामुळे सध्या गावोगावच्या वेशीवर झळकणारे होर्डिंग्स चर्चेत येत आहेत.
दिल्लीत पाठपुरावा करणार
भूमिपुत्रांकडून आंदोलनाची तयारी सुरू असताना खासदार बाळ्या मामा म्हात्रे हे केंद्र सरकारकडे दिल्लीत पाठपुरावा करणार आहेत. भूमिपुत्रांच्या असलेल्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू व केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार आहेत.
भाजपाला मोठा फटका बसणार
लोकसभेचे हिवाळी अधिवेशन जवळ येत आहे. त्या दरम्यान नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण प्रश्नी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र जर नामकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी न झाल्यास भाजपाला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत.