

भाईंदर : दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प अंतर्गत मेट्रो स्थानक उभारणीसाठी आ. नरेंद्र मेहता यांच्या मेसर्स सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीच्या मालकीची भूमी संपादन प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविली गेली असून त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच भाजपच्या माजी नगरसेवकाचे व त्यांच्या पत्नीचे नाव 146 ओवळा-माजिवडा तसेच 145 मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघातच्या मतदार यादीत असल्याची धक्कादायक बाब काँग्रेसने सोमवारी मीरारोडच्या अस्मिता क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेद्वारे उजेडात आणली.
मौजे मिरा येथील सर्वे क्रमांक 7 व 16 पै वरील 133 चौरस मीटर जागेत मेट्रो प्रकल्पाचे काम राबविण्यात येत असून हे काम एकूण 2 हजार 644 चौरस मीटर क्षेत्रात करण्यात येत असल्याची बाब भूमी संपादन प्रक्रियेत समाविष्ट केल्याने त्यात शासनाच्या निधीचा अपव्यय करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हि जमीन गेल्या 25 वर्षांपासून पालिकेच्या ताब्यात असून त्या जागेत वहिवाट रस्ता व गटर अस्तित्वात असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे, महाराष्ट्र जमीन संपादन अधिनियम 2013 मधील कलम 4 व 24, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1966 अन्वये नियम बाह्य असून ती जमीन खाजगी दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जागेचे हक्क व मालकी अधिकार मेसर्स सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीला कोणत्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे स्थानिक प्रवक्ते रवींद्र खरात यांनी जिल्हाधिकार्यांसह पालिका आयुक्त तसेच राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडे केली आहे.
पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसैन, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, मुख्य प्रवक्ते प्रकाश नागणे, युवा अध्यक्ष सिद्धेश राणे, प्रवक्ता जय ठाकूर, राकेश राज पुरोहित आदी उपस्थित होते.
भाजपाच्या माजी नगरसेवकाचे पत्नीसह दोन मतदार संघात नाव असल्याचा आरोप
भाजपचे माजी नगरसेवक थेराडे यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव ओवळा-माजिवडा तसेच मिरा-भाईंदर विधानसभा मतदार यादीत असल्याची गंभीर बाब पक्षाचे प्रवक्ते दीपक बागरी यांनी निदर्शनास आणून दिली. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून यात विशेष म्हणजे त्यांची निवासी इमारत तीन मजल्यांची असताना त्यांचा फ्लॅट 403 व 408 असा दाखविण्यात आल्याचा आरोप बागरी यांनी केला आहे.