ठाणे : सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचे काम म्हाडा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने करत आहे. पुढील पाच वर्षांत 30 ते 35 लक्ष घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, सरकारी आणि खासगी मिळून 50 लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले. कोकण म्हाडाच्या 5 हजार 354 घरे व 77 भूखंडांच्या संगणकीय सोडतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ठाणे, ओरोस (सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या घरांची आणि भूखंडांची ही सोडत पारदर्शक संगणकीय पद्धतीने काढण्यात आली. म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नसून लाखो कुटुंबांच्या आनंदाचे कारण ठरली आहे. आतापर्यंत 9 लाख घरे म्हाडामार्फत वितरित झाली. त्यात आणखी 60 हजार व 43 हजार घरांची आता भर पडली आहे. परवडणारी घरे, नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि गिरणी कामगारांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण आम्ही तयार केले आहे. तसेच आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी परवडणारी भाड्याची घरेही योजनेत समाविष्ट केली आहेत, असे शिंदे म्हणाले.
पुढील पाच वर्षांत उभारणार 30 ते 35 लाख नवीन घरे
राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार पुढील पाच वर्षांत 30 ते 35 लाख नवीन घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून खासगी व सरकारी क्षेत्रात मिळून सुमारे 50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असा अंदाज उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.