

डोंबिवली (ठाणे) : रेल्वे प्रशासनाच्या मालवाहू वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दिल्ली ते जेएनपीटी या डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पातील सीटीपी ११ या प्रकल्पाचे काम सुरु आहे. कल्याण-शिळ महामार्गावरील निळजे रेल्वे उड्डाण पुलाची उंची कमी असल्याने डीएफसीसीच्या डबल कंटेनर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हा जुना उड्डाणपूल तोडून नव्याने त्याची नव्याने बांधणी करण्यात येणार आहे. या कामासाठी ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमार्फत रेल्वे प्रशासनाच्या डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम राज्य महामार्ग क्र. ७६ या कल्याण-शिळ महामार्गावरील लोढा पलावा एक्सपेरिया मॉलजवळ कल्याणहून शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर होणार आहे. या मार्गावरील निळजे येथिल रेल्वे मार्गावर असलेल्या उड्डाण पुलाची उंची कमी असल्याने तो तोडून त्याची पुर्नंबाधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार असून ७ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ९ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार आहे. या कमासाठी कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ही अधिसूचना वाहतूक नियंत्रण विभागाने जारी केली आहे. त्यानुसार कोळसेवाडी वाहतूक उपविभागाकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
नवी मुंबईसह पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या निळजे उड्डाणपूलाच्या पुर्नबांधणी कामाला शुक्रवारपासून (दि.7) प्रारंभ होत असून त्यासाठीचे वाहतूक बदल असे...
प्रवेश बंद १ - कल्याणकडून शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निळजे कमानीजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सदरची वाहने निळजे कमानीजवळून उजवीकडे वळण घेऊन लोढा पलावाकडून कल्याणकडे येणाऱ्या वाहीनीवरून महालक्ष्मी हॉटेलपासून पुढे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद २ - लोढा पलावा, कासाबेला, लोढा हेवन, एक्सपिरिया मॉलकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निळजे पुलाच्या चढणीला असलेल्या एक्सपिरिया मॉलच्या बाजूला कल्याणकडे जाणाऱ्या वाहीनीवर प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सदरची वाहने कल्याण-शिळ महामार्गाने शिळफाट्याच्या दिशेने जाऊन देसाई खाडीपूल पार करून सरस्वती टेक्सटाईल समोरून उजवीकडे वळण (यु टर्न) घेवून नवीन पलावा उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद ३ - मुंब्रा आणि कल्याण फाट्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या ६ चाकी व जड/अवजड वाहनांना मुंब्रा वाहतूक उपविभागाच्या हद्दीत कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण सदरची ६ चाकी व जड/अवजड वाहने कल्याण फाटा-शिळफाटा-मुंब्रा बायपास-खारेगाव टोलनाका मार्गे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद ४ - कल्याणकडून मुंब्रा/कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या ६ चाकी, जड/अवजड वाहनांना काटई चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सदरची ६ चाकी व जड/अवजड वाहने काटई चौक-खोणी नाका-तळोजा एमआयडीसीमार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद ५ - नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीमार्गे खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथून काटई/बदलापूर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या ६ चाकी व जड/अवजड वाहनांना खोणी नाक्यावर असलेल्या निसर्ग हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सदरची ६ चाकी व जड/अवजड वाहने खोणी नाक्यावर असलेल्या निसर्ग हॉटेल येथे उजवे वळण घेऊन काटई/बदलापूर पाईपलाईन-नेवाळीमार्गे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद ६ - अबरनाथ, बदलापूरकडून काटई-बदलापूर पाईपलाईन रोडने काटई चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या ६ चाकी आणि जड/अवजड वाहनांना खोणी नाक्यावर असलेल्या निसर्ग हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून सदरची ६ चाकी व जड/अवजड वाहने खोणी नाक्यावर असलेल्या निसर्ग हॉटेल येथून डावीकडे वळण घेऊन तळोजा एमआयडीसीमार्गे इच्छित स्थळी जातील.
अखेर गंगेत घोडं न्हालं...
या संदर्भात माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, निळजे येथील रेल्वेचा जुना उड्डाण पूल मोडकळीस आला होता. आमदार असताना या पुलाला तोडण्याऐवजी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला सूचना दिली होती. तसेच पर्यायी दुसरा नवीन पुल तयार होईपर्यंत हे काम थांबविण्यात आले होते. आता नवीन पुल उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या पुलावर अवलंबून असलेल्या प्रवासी आणि वाहतूकदारांच्या व्यवस्थेसाठी पुलाचा नव्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला, या निर्णयाचे स्वागत आहे. तसेच या पुलामुळे कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी बऱ्याचश्या प्रमाणात कमी होणार असल्याचेही राजू पाटील यांनी सांगितले.