

डोंबिवली : पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशिल असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ४ जे अंतर्गत असलेल्या तिसगांव प्रवेशद्वाराच्या बाजूला नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या पदपथवर एका वृक्ष प्रेमीने बदामाचे झाड लावले आहे. हे झाड बऱ्यापैकी जगले आणि त्याची वाढही होत आहे. परंतु या झाडावर अतिक्रमण करून चक्क त्यावर फटाक्याचे दुकान उभारण्यात आले आहे. हा प्रकार पाहणाऱ्या निसर्गप्रेमी पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सुरूवातीला दुकानाच्या चालकाने हे झाड लाल कपड्याने झाकून ठेवले होते. ही गंभीर बाब वृक्ष प्रेमीच्या लक्षात येताच त्याने या झाडावर गुंडाळलेता लाल कपडा काढून टाकला. हे झाड कोमेजून गेल्याचे आढळून आले. एकाने पर्यावणपूर्वक झाड लावून वाढवायचे आणि दुसऱ्याने असुऱ्या कमाईसाठी त्याला मरणासन्न अवस्थेला पोहोचवायचे, असा उलटा प्रकार असल्याच्या भावना वृक्ष तथा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
फटाक्याचे दुकान उभारल्यामुळे जिवंत झाडाला मरणासन्न अवस्थेकडे नेणाऱ्याला दुकानदाराबद्दल पादचारी, निसर्गप्रेमी, पर्यावरणवाद्यांसह परिसरातील रहिवाशांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे झाडावर फटाक्याचे दुकान उभारण्याची परवानगी देणाऱ्या केडीएमसीची पर्यावरणाप्रती संवेदनशीलता किती ? असा प्रश्न वृक्षप्रेमी विचारू लागले आहेत.