

ठाणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या (RSS) राष्ट्रभक्त संघटनेवर बंदी घालण्यासंबंधीचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. जेव्हा जेव्हा देशावर कोणतेही संकट कोसळते, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नेहमी मदतीसाठी पुढे सरसावतो. अशा संघटनेवर बंदी घालण्याबाबतचे वक्तव्य दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो.
स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणाऱ्या नेत्यांबद्दल विचारले असता, शिंदे यांनी लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो, असे नमूद केले. मात्र, महायुतीच्या ताकदीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला. हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. मात्र, महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'लाडकी बहीण' योजनेबाबत पसरलेल्या अफवांवरही शिंदे यांनी पूर्णविराम दिला. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणारच आणि ही योजना अखंडपणे, अविरतपणे सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट केले आहे.