

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात गेल्या काही दिवसांपासून घरांतून निघणारा कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग जमू लागले आहेत. काही ठिकाणी सलग दोन-तीन दिवस घंटागाड्या न आल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. वेळेवर कचरा न उचलल्याने परिसरात अस्वच्छतेच्या साम्राज्यासहा रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. समाज माध्यमांवर त्रस्त झालेल्या रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात रोष व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या संदर्भात मिलापनगर येथील ज्येष्ठ रहिवासी तथा वकील मुकुंद वैद्य यांनी या संदर्भात थेट महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांना ई-मेलद्वारे सविस्तर तक्रार पाठवली आहे. जर परिस्थिती लवकरच सुधारली नाही, तर स्थानिक रहिवासी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांकडे ऑनलाईनद्वारे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा या भागातील जागरूक रहिवासी राजू नलावडे यांनी दिला आहे.
एमआयडीसीच्या निवासी परिसरातील कचऱ्याच्या समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने अद्याप गांभीर्याने लक्ष दिलेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या चेन्नई पॅटर्ननुसार कचरा संकलनाचे काम सुमित एन्कलो या खासगी ठेकेदाराकडे सोपविण्यात आले आहे. मात्र ठेकेदाराकडे पुरेशा घंटागाड्या आणि मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे नियमित संकलन होत नसल्याचे जागोजागी साठलेल्या कचऱ्यातून दिसून येते.
याशिवाय ओला आणि सुका असा वेगळा न करता कचरा एकत्रच उचलला जात असल्याने स्वच्छतेच्या प्रक्रियेलाच धक्का बसत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. परिणामी परिसरात रोगराईचा फैलाव होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे जागरूक रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांचे तक्रारींद्वारे लक्ष वेधले आहे. यावर उपायुक्त कोकरे यांनी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन तक्रारदार रहिवाशांना दिले आहे.
कथित नेत्यांची समस्यांकडे पाठ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणारे तथाकथित इच्छुक उमेदवारांना वेळ नसल्याचे कचऱ्याच्या साठलेल्या ढिगाऱ्यांतून दिसून येते. दिवाळी सणाच्या काळात वारंवार वीज आणि पाणी पुरवठा खंडित होत असल्याने एमआयडीसी परिसरातील रहिवासी अधिकच संतप्त झाले आहेत. या सर्व समस्यांना वैतागून आता रहिवाशांनी प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जर स्थिती सुधारली नाही तर महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे माहिती जागरूक रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले.