

सापाड (ठाणे) : दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण ! परंतु यंदा कल्याणातील अनेक संकुलांमध्ये हा सण आनंदाचा नव्हे तर संतापाचा ठरला आहे. ऐन दिवाळीत शहरातील अनेक भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सजावट, कंदील, रंगरंगोटी आणि लाइटिंगऐवजी नागरिकांचे लक्ष आता फक्त "पाणी केव्हा येणार?" याकडे लागले आहे. पाण्याअभावी रहिवाशांचा महापालिका विरोधात संताप उफाळून आला असून पाणी मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आला.
नळ कोरडे पडले
शहरातील गगनभेदी इमारती, उंच सोसायट्या आणि नव्याने विकसित प्रभागांमध्ये अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक इमारतींमध्ये नळ कोरडे पडले असून, रहिवाशांना टँकर मागवून तहान भागवावी लागत आहे. टँकरने पाणी आणणे ही सोपी गोष्ट नसून त्यासाठी प्रत्येक वेळेस मोठा आर्थिक भूदंड सोसायटींना सहन करावा लागत आहे. काही सोसायटींना दररोज हजारो रुपयांचा टैंकर मागवावा लागत असल्याने रहिवाशांचा दिवाळीचा खर्चच कोलमडला आहे. सजावटीऐवजी 'टाकी भरली का?' हा प्रश्न सोसायटीच्या रहिवाशांसमोर उभा ठाकला असून नेहमीप्रमाणे या काळात सोसायट्यांमध्ये कंदील लावणे, घरांना लाईटिंग करणे आणि फराळाच्या तयारीचा गडबडाट असतो. मात्र यावर्षी या सगळ्याऐवजी "पाणी आलं का?" याकडे सर्व रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे यावर्षी कल्याण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्या आणि धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा आहे. पुरेसा पाऊस पडूनही शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कल्याण पश्चिम, गांधारी परिसरातील उंच इमारतींमध्ये पाणीपुरवठा अनियमित असल्याने रहिवाशांचा त्रास वाढला आहे. एका रहिवाशाने सांगितले, "दिवाळी सुरू झाली असूनही घरात अंघोळ, स्वयंपाक, कपडे धुण्यासाठी पाणी नाही. प्रत्येक वेळेस महापालिकेला तक्रार केली तरी प्रतिसाद मिळत नाही. काही ठिकाणी रहिवाशांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.