डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: दिवाळी सणानिमित्त गुरूवार आणि शुक्रवारी डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष असतो. हा रस्ता तरुणाईने गजबजून जातो. या कालावधीत चेंगराचेंगरी किंवा अन्य कोणतीही दुर्घटना टाळण्यासह विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी फडके रोड भागात ढोल-ताशा बडवायला पोलिसांनी बंदी घातली आहे. ध्वनी मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या एका कार्यक्रमाला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढोल-ताशाला बंदी असे चित्र निर्माण झाले आहे.
आचारसंहितेमुळे पक्षीय नेते या कार्यक्रमात किती सहभागी होतात याविषयी अनेकांनी अनभिज्ञता दर्शवली. श्री गणेश मंदिर संस्थानने दिवाळी पहाट कार्यक्रम शांतते पार पडेल. या दृष्टीने नियोजन केले आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त काही संस्था फडके रोडवर डीजे लावून कार्यक्रम सादर करतात. या संस्थांनी ध्वनी मर्यादाचे पालन करून डीजे लावायचे आहेत. ध्वनी मर्यादेचे पालन, इतर कुणालाही कर्णकर्कश आवाजाचा त्रास होणार नाही. याची काळजी आयोजकांनी घ्यायची आहे. आचारसंहितेचे पालन हा यात महत्वाचा विषय असल्याचे रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले. तसेच डोंबिवली परिसरातील पथकांना नोटीस पाठवून ढोल-ताशा वादन बंदीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. फडके रोड, नेहरू रोड, अप्पा दातार चौक, मदन ठाकरे चौक भागात ढोल-ताशा वादनास बंदी असणार आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील फडके रस्त्यावर जमवून दिवाळी सणाच्या आप्तस्वकीय, मित्र, मैत्रिणींना शुभेच्छा देण्याची जुनी परंपरा आहे. डोंबिवलीसह बदलापूर, कल्याण, ठाणे, पलावा परिसरातून तरूण-तरूणी दिवाळी सण साजरा करण्यासाठी फडके रोडवर येतात. या उत्साही तरुणांमुळे फडके रस्ता गजबजून जातो. गेल्या वर्षी दिवाळी पहाटनिमित्त फडके रोडवर तरूणांची गर्दी जमली होती. याचवेळी या रस्त्यावर ढोल-ताशा पथकांचे वादनाचे कार्यक्रम सुरू असताना बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. हा प्रकार टाळण्यासाठी, तसेच आचारसंहितेचे पालन करण्याकरिता परिसरातील शांततेचा भंग होऊ नये म्हणून दिवाळी पहाटच्या दिवशी फडके रस्ता परिसरात रामनगर पोलिसांनी ढोल-ताशा पथकांना वादनास बंदी केली आहे.
फडके रोडवर दिवाळी पूर्व संध्या, दिवाळी पहाट हे कार्यक्रम होणार असल्याने वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी गुरूवारी रात्री 12 ते शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत फडके रोडवरील वाहतूक नागरिकांच्या सोयीसाठी, तसेच उत्सवी कार्यक्रम शांततेत पार पडावेत यासाठी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. फडके रोडवरील बाजीप्रभू चौकातून आप्पा दातार चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आप्पा दातार चौकात प्रवेश बंद केला जाणार आहे. फडके रोडकडे येणारी वाहने जोशी हायस्कूल, नेहरू रोडने डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येतील. एमआयडीसी परिसरातून डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने टिळक रोड, सावरकर रोड, इंदिरा चौकमार्गे रेल्वे स्थानकाकडे जातील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.