

ठाणे : घोडबंदरच्य ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात बेदरकारपणे झाडांची छाटणी करून तब्बल 70 पक्षांचा बळी घेणार्या ठेकेदार आणि सोसायटी कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यात शुक्रवारी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी असलेल्या 30 पक्षांपैकी पाच पक्षांचा मृत्यू झाला आहे.
आनंदनगर परिसरात बिल्डिंग नंबर ए 7 समोर सोसायटीच्या आवारात खासगी ठेकेदाराकडून गुरुवारी दुपारी झाडांची छाटणी सुरू होती. या छाटणी वेळी शेकडो पक्षांची घरटी कोसळली, अंडी फुटली आणि यात पक्षांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ ‘मायपल क्लब फाउंडेशन’ या वन्यजीव संस्थांना प्राप्त होताच संस्थेची टीम तत्काळ तिथे पोहोचली.
तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून कासारवडवली पोलिस ठाण्याचे कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी, वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पक्ष्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सर्वत्र पसरले होते. दरम्यान, वनविभागाने झाडांची छाटणी करणारा खासगी ठेकेदार आणि सोसायटीच्या कमिटीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लपवण्यासाठी प्रयत्न सुरु होते असा आरोप वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे उद्यान तपासनीस रोहित पवार यांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच उद्यान निरीक्षक डॉ. राहुल दुरगुडे यांनी या प्रकरणी ऋतू इन्क्लेव्ह सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठेकेदार पळाला असल्याचे माहिती समोर आली आहे.