

डोंबिवली : डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सेना काँग्रेसचा सुफडा साफ करायला घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर केडीएमसीवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील शिंदे गटाचे पदाधिकारी/कार्यकर्ते, काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी जाहीरपणे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा सोहळा डोंबिवली जिमखान्याच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी 12 समर्थक माजी नगरसेवकांसह केलेला प्रवेश सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरला.
ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची तीन महिन्यांपासून चर्चा सुरू होती. रविंद्र चव्हाण यांनी गणपती दर्शनादरम्यान नवनाथ कृपा निवासस्थानी दीपेश म्हात्रे यांची भेट घेतल्यापासून या चर्चेला उधाण आले होते. या चर्चेला रविवारी डोंबिवली जिमखान्याच्या सोहळ्यात पूर्णविराम मिळाला.
दीपेश म्हात्रे यांच्या समवेत त्यांच्या मातोश्री तथा माजी नगरसेविका रत्नाबाई म्हात्रे, धाकटे बंधू तथा माजी नगरसेवक जयेश आणि त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हा प्रवेश करवून घेण्यासाठी माजी खासदार कपील पाटील, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा पुढाकार महत्वाचा ठरला आहे. आईकडून औक्षण आणि आशीर्वाद घेतल्यानंतर मोठागाव येथील नवनाथ कृपा बंगला येथून दिपेश म्हात्रे आणि त्यांचे समर्थक मिरवणुकीने वाजतगाजत डोंबिवली जिमखान्याच्या पटांगणावर पोहोचले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी लागणारी व्यूहरचना आणि त्यात आपले स्थान मजबूत करण्यासाठी या मंडळींनी हे प्रवेश केले. भाजपात प्रवेश करण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली जिमखान्याच्या पटांगण गर्दीने फुलून गेले होते.
भाजपामध्ये लवकरच आणखी काही प्रवेश होणार असल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. या कार्यक्रमाला आमदार सुलभा गायकवाड, माजी खासदार कपील पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब, प्रदेश नेते शशिकांत कांबळे, पदाधिकारी उपस्थित होते.