डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या नांदिवली भागातील नमस्कार ढाब्यासमोरच्या सार्वजनिक रस्त्यावर एका रिक्षावाल्याने भरधाव वेगात रिक्षा चालवून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महिलेला गंभीर दुखापती झाल्या असून या अपघातात दुचाकीची मोडतोड झाली आहे. अपघातानंतर रिक्षावाला जखमी महिलेला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून रिक्षा सोडून पळून गेला आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
या संदर्भात चक्कीनाका भागात राहणाऱ्या तक्रारदार जखमी महिला पूजा इटोरिया यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पूजा इटोरिया या कल्याण पूर्वेतील नांदिवली नाक्याकडून चक्की नाक्यावरील वाहतूक बेटाला वळसा घालून दुचाकीवरून जात होत्या. दुचाकी नांदिवलीतील नमस्कार ढाब्यासमोरच्या सार्वजनिक रस्त्यावर येताच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने पूजा इटोरिया यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे दुचाकी काही फूट अंतरावर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली. या अपघातात पूजा यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. शिवाय त्यांच्या दुचाकीची मोडतोड झाली. पूजा रस्त्याच्या कडेला पडल्या आणि त्या जखमी झाल्याचे माहिती असूनही धडक देणारा रिक्षावाला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. इतर पादचाऱ्यांनी जखमी पूजा यांना मदत केली. कोळसेवाडी पोलिसांनी बेदरकार रिक्षावाल्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून रिक्षाच्या क्रमांकावरून पोलिसांनी बेपत्ता चालकाचा शोध सुरू केला आहे.