बदलापूर : चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूरमध्ये उसळलेल्या हिंसक आंदोलनानंतर राज्य शासनाने बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री दहा वाजल्यापासून बदलापूर शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. बदलापुरमध्ये मोबाईल इंटरनेटशी निगडित असलेले आर्थिक व्यवहार, गुगल पे, फोन पे सारख्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी बंद आहेत. व्हाट्सअॅप, फेसबूक सारखी रोजच्या वापरातील सर्वसामान्य नागरिकांची सोशल माध्यम सेवा बंद आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार पुढील काळात घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शहरातील इंटरनेट सुविधा सुरू करण्यात येणार आहे.