बदलापूर: पुढारी वृत्तसेवा : बदलापुरातील दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूर येथील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सेक्रेटरी तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका आठवले यांच्या विरोधात पोलिसांनी अक्षय शिंदे च्या न्यायालयीन कोठडीची मागणी करताना पाहिजेत आरोपींमध्ये या तिघांचा समावेश केला आहे. एसआयटी कडे हा तपास असल्यामुळे आता या प्रकरणात एसआयटीने प्राथमिक जबाब नोंदवल्यानंतर या गुन्ह्यामध्ये पोस्को कलम 21 मध्ये वाढ करण्यात आली होती. (Badlapur School Rape Case)
आज पुन्हा न्यायालयात नराधम अक्षय शिंदे याचा रिमांड संपल्यामुळे पोलिसांनी या प्रकारात आणखीन काही कलम वाढवण्याची मागणी कल्याण सत्र न्यायालयाकडे केली होती. ती मागणी न्यायालयाने मान्य केली असून यामध्ये कलम पोस्को कलम 6 आणि पोस्को कलम 10 चाही समावेश करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या अधिपत्याखाली हा तपास होत असल्याने आता या प्रकरणाशी संबंधित विविध घटकातील आरोपींना चौकशीअंती अटक करण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि मुख्याध्यापिका या तिघांवर पहिल्या टप्प्यात पोलिसांनी पाहिजे असलेल्या आरोपींमध्ये समावेश केल्यामुळे लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित संस्थाचालकांचेही जबाब नोंदवण्याचे काम एसआयटी कडून करण्यात येत असून त्यांच्यावरही अटकेची तलवार कायम आहे. (Badlapur School Rape Case)