बदलापूर : पुढारी वृत्तसेवा: बदलापूर शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राज्य शासनाने जी आयुध वापरायला हवी होती, ती सर्व वापरली आहेत. या प्रकरणात पोस्को सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात संवेदनशीलपणे जे करायला हवं होते, ते राज्य शासनाने केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण विरोधकांनी करू नये, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. वाघ यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. (Badlapur School Case)
त्या पुढे म्हणाल्या की, शाळेतील संचालक मंडळावरही कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणी एसआयटी चौकशी नेमून उज्ज्वल निकम यांच्यासारखे वकील या प्रकरणात दिले आहेत. तसेच पोलिसांवर झालेल्या आरोपा प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह दोन पोलिसांचा निलंबन ही करण्यात आले आहे. (Badlapur School Case)
बदलापूर येथे झालेल्या आंदोलनात बाहेरील काही जण आल्याचा संशय त्यांनी व्यक्त करून पोलिसांनी त्या दष्टीने तपास करण्याची मागणी केली. तसेच या आंदोलनासाठी ज्यांनी सुरुवातीपासून चिथावणी दिली. त्या सगळ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.