

नेवाळी : ग्रामीण भागात दीपावलीच्या पूर्वसंध्येला आठ दिवस शिल्लक असताना शेतकरी आठींग्रे काढले जातात. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांची भात पिके ही आपल्या घरी येत असतात. त्यामुळे या भात पिकांचे पूजन हे शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहाने करत असतात. भाताच्या झोरी, कंगे, आणि अंगणात चुलीमधील राखाडी चाळून हे आठींग्र काढले जातात. मात्र आता काँक्रीटच्या युगात नाही कुठे मातीचे अंगण राहिले आणि नाही यंदा दिवाळी आधी भात पिके घरी आली त्यामुळे यंदा आठींग्रे काही दिसेनासे झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून आले आहेत.
कोकण किनारपट्टीवर वसलेल्या आगरी-कोळी-कराडी-कुणबी समाज मोठ्या प्रमाणात भातपिकांची लागवड करत असते. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भात पीक हे शेतकऱ्यांच्या दारी येत असते. मात्र मागील दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने भातपिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केलेली आहे. त्यामुळे यंदा देखील शेतकऱ्यांच्या घरी भात पिके दिवाळी आधी आलीच नाहीत. तर काँक्रीटच्या युगात आता शेतकऱ्यांची आंगण आणि घरामधील आंगण देखील कालबाह्य झाले आहेत. तर आठींग्र काढण्याची पद्धत देखील दिवसेंदिवस कमी होत चालली दिसून येत आहे.
हे आठींगले काढण्यासाठी ज्येष्ठ महिला या चुलीमधील राखाडी चाळून चाफ्याच्या झाडाच्या पानांच्या साहाय्याने झोरींच्या भोवती आठींगले काढतात. तर अंगणात निरनिराळे चित्र रेखाटून दीपावलीचे स्वागत करत असतात. आठींग्रे काढल्यानंतर त्यांना तांदळाच्या पिठाचे पोळे तयार करून नैवेद्य देखील दाखवले जात असते. मात्र आताच्या कलियुगात हे आठींग्र कालबाह्य होत असतानाचे चित्र दिसून येते.
ठाणे रायगड, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज देखील ज्येष्ठ महिला आवर्जून दिवाळीला आठ दिवस शिल्लक असताना आठींग्रे काढतात. कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर चार ते पाच दिवसांनी आठींग्रे काढण्याची पद्धत असते. आठींग्रे झाल्यानंतर दिवे लावण्याची पद्धत जरी सुरू असली तरी आता आठींग्रेे काढण्याची पद्धत मात्र कालबाह्य होत आहे.
‘आठ आठींग्र, बारा फटांग्रे”
‘आठ आठींग्र, बारा फटांग्रे” अशी जुनी म्हण देखील आहे. दसऱ्यानंतर आठ अधिक बारा म्हणजे 20 दिवसांनी दिवाळी येत असते. या म्हणीत आठींग्रे म्हणजेच त्याला आठींगले असे संबोधले जात जाते. यावरून आठींगल्यांचे किती महत्व आहे हे समजून येते. हा दिवाळीचा रिवाज म्हणजेच परंपरा असून अश्विन अष्टमीला आठींगल्यांच्या दिवशी एरंड्याची पाने घराच्या छतावरील बांबूंना खोचली जातात.
या काळात अंगण हे शेणणारे सारवून कणा घातला जातो. या काळात शेतीतील आलेले सोन्यासारखे धान्य त्याची पूजा करून त्याला तांदळाच्या पिठाच्या चामट्या तयार करून फुल ठेवून नैवेद्य दाखवले जात असत. प्रत्येक जिल्ह्यात आणि परिसरात या परंपरा काही प्रमाणात बदलल्या दिसून येतात. मात्र बदलत्या काळानुसार ही परंपरा आता मात्र कालबाह्य होत चालली आहे.