३ महिन्यांत २० मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर | पुढारी

३ महिन्यांत २० मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर

ठाणे ; अनुपमा गुंडे : गेल्या दोन वर्षपासून थंडावलेला मराठी चित्रपटांचा गल्ला 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत का होईना खुळखुळविण्याचे धाडस मराठी निर्माते आणि दिग्दर्शक करण्याच्या तयारीत आहेत. दीड – पावणेदोन वर्षापासून डब्यात बंद असलेले बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असलेले 20 मराठी चित्रपट येत्या तीन महिन्यात प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या कहरात 50 टक्के क्षमतेनं का होईना चित्रपटगृहांचे दरवाजे खुले असायला हवेत, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे.

राज्य शासनाने तिसर्‍या लाटेचे कडक निर्बंध जारी केले असले तरी नाट्य आणि चित्रपटगृहाबद्दल अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे संक्रांतीच्या मुहूर्तापासून झळकणार्‍या मराठी चित्रपटांसाठी सज्ज असलेल्या निर्मात्यांचे शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

मार्च 2020 पासून सुरू झालेल्या कोरोना टाळेबंदीमुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही ठप्प होते. चित्रीकरणाला मुभा मिळाल्यानंतर गेल्या वर्ष – दीड वर्षात झळ सोसून अनेक चित्रपट निर्मात्यांनी अपूर्ण चित्रपट पूर्ण केले. पण राज्य शासनाने नाट्य आणि चित्रपटगृह सुरू करण्याला गेल्या वर्षीला 22 ऑक्टोबरला हिरवा कंदील दिला. त्यानंतर झिम्मा, पांडू, विजेता, जयंती, हॅशटॅग हे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही चित्रपटांना रसिकांचा प्रतिसादही लाभला.

दीड – दोन वर्षे चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर न पडलेल्या रसिकांनी काही चित्रपटांना दाद दिली असली तरी चित्रपट निर्मितीचा खर्च आणि गेली 2 वर्षे सोसलेली आर्थिक झळ भरून काढण्यासाठी 100 टक्के प्रेक्षक उपस्थितीची आणि प्रतिसादाची अपेक्षा निर्मात्यांना आहे, डिसेंबरमध्ये कोरोना रूग्णांत घट होत असल्याने जानेवारीत 100 टक्के क्षमतेने चित्रपटगृहांची दारे खुली होण्याची आशा होती.

त्यामुळे अनेक निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या तारखाही समाज माध्यमांद्वारे जाहीर केल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोना आणि ओमायक्रॉनच्या शिरकाव्यामुळे शासन 100 टक्के क्षमतेचा निर्णय घेण्यास असमर्थ असले तरी 50 टक्के क्षमतेने तरी चित्रपटगृहांची दारे प्रेक्षकांसाठी खुली असतील, अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे.

त्यामुळे राज्यात कोरोनामुळे जारी होत असलेल्या निर्बंधामुळे मराठी निर्मात्यांनी जाहीर केलेल्या चित्रपटांच्या तारखांबाबत अद्याप तरी मागे घेतल्या नाहीत. 14 जानेवारीपासून ते 11 मार्चदरम्यान 20 चित्रपटांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निर्मात्यांचे डोळे शासनाच्या भूमिकेकडे लागले आहेत. संक्रांतीला अजून आठवडा आहे, त्यामुळे येत्या आठवडाभरात वेट अ‍ॅन्ड वॉचच्या भूमिकेत निर्माते आहेत.

प्रदर्शनासाठी सज्ज असलेले मराठी चित्रपट

14 जानेवारी – कॉफी, स्टोरी ऑफ लागीरं, सोयरिक
21 जानेवारी – नाय वरण -भात लोणचं, कोण नाय कोणाचा, पावनखिंड
26 जानेवारी – बाईपण भारी देवा
28 जानेवारी – लकडाऊन लग्नं
4 फेब्रुवारी – फास, लॉ ऑफ लव्ह, झोम्बिवली,
11 फेब्रुवारी – 1 नंबर एकदम कडक,वन फोर थ्री, लोचा झाला रे, का रे देवा,पांघरूण, मजनू
18 फेब्रुवारी – सरसेनापती हंबीरराव
4 मार्च – झॉलीवूड, भारत माझा देश आहे.
11 मार्च – लग्नं

Back to top button