पुढारी ऑनलाईन : ठाण्यात ठाकरे गटाची युवा कार्यकर्ती रोशनी शिंदे हिला झालेली मारहाण निंदणीय आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशा निंदनीय घटना घडत आहेत. राज्यात घडत असलेल्या घटनांवरून राज्यात कोणत्या मानसिकतेचे सरकार बसलंय ते दिसतंय असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी सरकारला धारेवर धरले.
शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या कार्यकर्तीवर हल्ला केला. दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांनी ठाण्यातील रूग्णालयात संबंधित तरूणीची भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, या घटनेत सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा. सरकारने संबंधित ठाकरे गटाच्या कार्यकर्तीला पूर्णपणे संरक्षण दिले पाहिजे. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींवर तातडीने कारवाई केली पाहिजे. वैभव कदमने आत्महात्या का केली? त्यांच्यावर काय दबाब होता? याबाबतही पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे, असे देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सुसंस्कृत ठाण्याची ओळख पुसून 'गुंडाचं ठाणं' अशी ठाण्याची ओळख करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनात आणलं तर या क्षणाला त्यांची गुंडगिरी ठाण्यातून आणि राज्यातून मुळासकट उखडून टाकण्याची हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे. महिला गुंडांकडून हल्ले करणारे न्यायालयाने म्हणल्याप्रमाणे नपुसंकच आहेत, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे रोशनी शिंदेंवरील झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, असा आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.